पाकिस्तानातून भारतात दरवर्षी येतात 5 अब्ज डॉलर्स
By Admin | Published: February 27, 2016 02:47 PM2016-02-27T14:47:34+5:302016-02-27T14:47:34+5:30
भारतात सर्वाधिक विदेशी चलन ज्या देशांमधून येते त्या देशांमध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - भारतात सर्वाधिक विदेशी चलन ज्या देशांमधून येते त्या देशांमध्ये पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी पाकिस्तानमधून भारतात पाच अब्ज डॉलर्स पाठवले गेले आहेत.
वॉल स्ट्रीट जर्नलने जागतिक बँकेच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही देशांमध्ये वित्त व्यवहार जवळपास बंद असताना ही आकडेवारी आश्चर्यजनक आहे. विशेष म्हणजे जागतिक बँकेच्या अहवालानुसार हा प्रकार नवीन नसून ही नित्य चालणारी प्रक्रिया आहे आणि दरवर्षी पाकिस्तानातून भारतात येणारे परकीय चलन वाढतच आहे.
गेल्या वर्षी पाकिस्तानमधून भारतात 4.90 अब्ज डॉलर्स आले, त्याच्या आदल्या वर्षी 4.79 अब्ज तर त्याच्या आधीच्या वर्षी 4.67 अब्ज डॉलर्स भारतात आल्याचे वॉल स्ट्रीटने म्हटले आहे. विशेष म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जाहीर आकडेवारीनुसार मार्च 2015 मध्ये पाकिस्तानातून भारतात अवघे 10 लाख डॉलर्स अधिकृतपणे आले आहेत.
हे असं का होतं?
वर्ल्ड बँकेने एक मॉडेल तयार केलं आहे, ज्यामध्ये लोकसंख्या, स्थलांतरीत, सरासरी उत्पन्न आणि त्या त्या देशातलं राहणीमान या सगळ्याचा अभ्यास करून कुठल्या देशात कुठून किती पैसा आला गेला याचे आडाखे बांधण्यात येतात.
पाकिस्तानमध्ये भारतात जन्म झालेले व आता पाकिस्तानात असलेले 14 लाख लोकं आहेत. परंतु ते अनिवासी भारतीय नाहीत. अशा या भारतीय जन्माच्या पाकिस्तानींकडून हा पैसा भारतात येतो असा दावा जागतिक बँकेचा आहे.
पाकिस्तानात जन्मलेले व आता भारतात असलेले 11 लाख लोक असून त्यांनी पाकिस्तानात 2 अब्ज डॉलर्स पाठवल्याचंही जागतिक बँकेच्या अहवालात असल्याचं वॉल स्ट्रीटने म्हटलं आहे.
हा सगळा पैसा दोन्ही देशांमधल्या कुटुंबांकडे व नातेवाईंकांकडे पाठवला जातो असं जागतिक बँकेचं ठाम मत आहे. तर काही वाचकांनी भारतामध्ये दहशतवादी कारवायांसाठी हा पैसा पाठवण्यात येतो की काय अशी भीतीही व्यक्त केली आहे.
दोन्ही देशांतील लाखो लोकांचे नातेवाईक दुस-या देशात आहेत आणि विविध कारणांसाठी हवालामार्गे, मित्रांसोबत पाकिस्तानमधून किंवा मिळेल त्या अन्य मार्गाने पैसे पाठवण्यात येतात हे निश्चित आहे असं वर्ल्ड बँक म्हणते.