सूर्यमालेत नववा ग्रह अस्तित्वात असल्याचे पुरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2016 02:49 AM2016-01-22T02:49:59+5:302016-01-22T02:49:59+5:30
आपल्या सूर्यमालेत नववा ग्रह अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पृथ्वीहून जवळपास दहापटीने अधिक आकारमान असलेल्या या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी हजारो वर्षे लागतात.
लॉस एंजल्स : आपल्या सूर्यमालेत नववा ग्रह अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पृथ्वीहून जवळपास दहापटीने अधिक आकारमान असलेल्या या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी मारण्यासाठी हजारो वर्षे लागतात.
संशोधकांनी या ग्रहाचे ‘प्लॅनेट नाईन’ असे नामकरण केले असून तो नेपच्यूनच्या तुलनेत सरासरी २० पट अधिक दूरवरून सूर्याचे परिभ्रमण करतो. सूर्यापासूनचे अंतर प्रचंड असल्याने प्लॅनेट नाईनला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास दहा हजार ते २० हजार वर्षे लागत असतील, असे संशोधकांनी सांगितले. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेचे कान्स्टेन्टीन बेटीगीन आणि माइक ब्राऊन यांनी गणिती मॉडेलिंग आणि कॉम्प्युटर सिम्युलेशनच्या माध्यमातून या नव्या ग्रहाच्या अस्तित्वाचा शोध लावला.
तथापि, त्यांनी हा ग्रह प्रत्यक्षात पाहिलेला नाही. प्राचीन काळापासून आतापर्यंत केवळ दोनच ग्रहांचा शोध लागला असून हा तिसरा असू शकतो, असे ब्राऊन म्हणाले. (वृत्तसंस्था)