2011 साली नेतान्याहू इराणवर हल्ला करणार होते, मोसादच्या माजी प्रमुखाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 03:49 PM2018-05-31T15:49:33+5:302018-05-31T15:49:33+5:30
तामिर पार्दो असे या माजीप्रमुखांचे नाव असून ते केशेट टीव्हीच्या उवादा या कार्यक्रमात त्यांनी नेतान्याहू यांच्या नावासह हा गौप्यस्फोट केला.
जेरुसलेम- इस्रायल आणि मध्यपुर्वेतील देशांच्या शत्रूत्वाला गेल्या 70 वर्षांचा इतिहास आहे. सौदी अरेबिया, सीरिया, लेबनॉन, इजिप्त, जॉर्डन यांच्याबरोबर इराण आणि इराक यांच्याशीही इस्रायलचे अनेकदा वाद किंवा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अचानक लष्करी करावाई करणाऱ्या या चिमुकल्या देशाने 2011 साली इराणवरही हल्ला करण्याचे नियोजन केले होते असे मोसाद या इस्रायली गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखाने सांगितले आहे. 2011 साली 15 दिवसांमध्ये इराणवर हल्ला करण्याची तयारी करा असे आदेश पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
(मोसादचे सध्याचे प्रमुख योसी कोहेन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि मोसादचे माजी प्रमुख तामिर पार्दो)
ऑपरेशन एन्टेबी या कारवाईमध्ये इस्रायलने आपले अपहृत नागरिक युगांडामधील एन्टेबी या विमानतळावरुन इदी अमिनच्या तावडीतून सोडवून आणले होते. तसेच इराकवर ऑपरेशन ऑपेरा या कारवाईद्वारे हल्ला करून इराकमध्ये आकारास येत असलेल्या अणूभट्ट्या उद्धवस्त केल्या होत्या. 1981 साली इस्रायलने केलेल्या या कारवाईमुळे सर्व जगाला आश्चर्याचा धक्का बसला होता. आताही अशाचप्रकारे इराणवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात इस्रायल होता असे मोसादच्या माजी प्रमुखांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.
तामिर पार्दो असे या माजीप्रमुखांचे नाव असून ते केशेट टीव्हीच्या उवादा या कार्यक्रमात त्यांनी नेतान्याहू यांच्या नावासह हा गौप्यस्फोट केला. मात्र त्यानंतर काय झाले याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले नाही.
इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री एहूद बराक यांनीही नेतान्याहू 2010 आणि 2011 साली इराणवर हल्ला करण्याच्या बेतात होते असा दावा केला होता मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा दावा लगेच फेटाळला होता. मात्र पार्दो यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.