नेमका, कोण होता ओमार मातीन?
By admin | Published: June 19, 2016 03:20 AM2016-06-19T03:20:39+5:302016-06-19T03:20:39+5:30
आॅरलॅण्डो येथील ‘पल्स’ या गे नाईट क्लबमध्ये घुसून अत्यंत थंड डोक्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल ४९ जणांचा जीव घेणाऱ्या ओमार मातीनने या घटनेच्या केवळ दोन दिवस
- अपर्णा वेलणकर (थेट अमेरिकेतून)
सॅन फ्रान्सिस्को : आॅरलॅण्डो येथील ‘पल्स’ या गे नाईट क्लबमध्ये घुसून अत्यंत थंड डोक्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल ४९ जणांचा जीव घेणाऱ्या ओमार मातीनने या घटनेच्या केवळ दोन दिवस आधी आपल्या लाईफ इन्शुअरन्स पॉलिसीचे तपशील बदलले होते. त्यात आपली पत्नी नूर सलमान हिचे नाव नव्याने नोंदले होते आणि बँकेच्या खात्यांवरही तिला संयुक्त भागीदार केले होते.
त्याही आधी, दोन महिन्यांपूर्वी ओमारने पोर्ट सेंट लुईस या गावातले आपले राहाते घर आपल्या बहिणीला केवळ दहा डॉलर्स एवढ्या नाममात्र किमतीला विकले होते.
हा (विचित्र) व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करून त्याची बहीण सबरिना अबासिन आणि अफगाणिस्तानमध्ये जन्मून अमेरिकेत शरणार्थी म्हणून आलेला तिचा नवरा मुस्तफा अबासिन यांची नावे त्या घराचे मालक म्हणून सिटी डॉक्युमेंटसमध्ये ताबडतोबीने लागावीत यासाठी त्याने धडपड केली होती. हा सारा व्यवहार ओमारची पत्नी नूर हिला माहिती होता, कारण तिनेच कागदपत्रांवर साक्षीदार म्हणून सही केली होती.
गेल्या एप्रिलपासून ओमारने फायरआर्म टे्रनिंग सुरू केले होते आणि ‘पल्स’ नाईटक्लबमधल्या त्याच्या फेऱ्याही वाढल्या होत्या.
रविवारच्या भल्या पहाटे ‘पल्स’मध्ये गोळीबार सुरू असताना ओमार नूरला मोबाईल फोनवर मेसेजेस पाठवत होता. ‘हैव यू सीन द न्यूज?’- असे विचारून त्याने हल्ल्याची बातमी ‘फुटल्याची’ खातरजमा करून घेतली होती.. पण नूरने केलेले फोन कॉल्स मात्र घेतले नव्हते.
वारूळ फुटून मुंग्या भुळभुळत बाहेर पडाव्यात तसे हे सारे तपशील फुटू लागले असून अमेरिकेवर हल्ला चढवण्यासाठी ‘बाहेरून’च कुणी येण्याची जरूरी नाही, याची जाणिव आता सर्वसामान्य नागरिकांनाही होताना दिसते आहे.
शुक्रवारी सीएनएन या वृत्तवाहिनीने अनेक तपशील उघड केले असून काऊंटर जिहाद नावाच्या एका संकेतस्थळाने ओमार मातीनचे वडील सिद्दिकी मातीन यांचे अफगाणिस्तानातील तालिबान्यांशी असलेले अतीव सलोख्याचे संबंधही प्रकाशात आणले आहेत.
या सिद्दिकी मातीन यांनी अफगणिस्तानात तालिबानला पाठिंबा देण्यासाठी द डुरांड जिर्गा नावाची एक संस्था स्थापन केली असून समलैंगिकतेवर विखारी टीका करणारे प्रचारसाहित्य या संस्थेने छापल्याचे सांगितले जाते.
ओमारचा मेहुणा मुस्तफा अबासिन उर्फ औराकझाई आणि त्याची बहीण सबरिना हे दोघेही या संस्थेचे ट्रस्टी आहेत.
ओमारची पत्नी नूर हिने प्रारंभीच्या तपासात एफबीआयला सहाय्य केले पण आता ती मूग गिळून गप्प असल्याचे सीएनएनच्या वृत्तात म्हटले आहे. या साऱ्याचा एकच अर्थ इथे अमेरिकेत काढला जातो आहे आणि अशा हल्ल्यांमध्ये वारंवार रक्तबंबाळ होणाऱ्या या देशासाठी तो आता नवीन उरलेला नाही : पल्स नाईट क्लबवरल्या हल्ल्याची पूर्वकल्पना ओमार खेरीज अन्य अनेकांना होती आणि ज्यांना ती होती ते सारे या कटाचे साथीदार होते, असे मानले तरी त्या बाहेरच्या अनेकांचे नाक-कान-डोळे उघडे असते, तर हा हल्ला टाळता आला असता.
अमेरिकेभोवती भिंत उभारून या देशाचा एक सुरक्षीत किल्ला करता येईल का आणि ‘बाहेरून’ आत येऊ इच्छिणाऱ्या मुस्लिमांसकट सर्वच इमिग्रण्टसवर प्रवेशबंदी लादून सुखाची झोप घेता येईल का, हा विषय या देशातल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रणांगणात गाजतो आहे.
... मात्र या गदारोळात आणखी एक (जुनीच) मोहीम (नव्याने) वेग घेते आहे : इफ यू सी समथिंग, से समथिंग!
तुमच्या आजूबाजुला काही संशयास्पद घडताना दिसत, जाणवत, ऐकू येत असेल, तर त्याबद्दल तातडीने सांगा!
जून २०१० मध्ये अमेरिकेच्या होमलैण्ड सिक्युरिटीने सुरू केलेली ही मोहीम म्हणजे आपल्या देसी ‘तुमचा शेजारी, खरा पहारेकरी’चा अमेरिकन अवतारच! फक्त एवढेच, की या माहिती संकलनाला शास्त्रशुध्द रुप देऊन त्याची एक समांतर ‘सिस्टीम’ या देशात उभी केली जाते आहे.
माध्यमेही या साऱ्या बदलांची, पुढे येणाऱ्या पर्यायांची विस्ताराने दखल घेताना दिसतात.
ओमारची पत्नी नूर सलमान म्हणते, तो असे काही करणार आहे याचा मला अंदाज होता!
हे प्रत्यक्ष हल्ल्याहून अधिक भयंकर आहे, असे इथे अनेकांना वाटते आहे.
देशव्यापी सुरक्षितता मोहीम
अमेरिकेतील डिपार्टमेंट आॅफ होमलॅण्ड सिक्युरिटीने नागरिकांच्या व्यापक सहभागासाठी सुरू केलेली मोहीम.
नेशनवाईड सस्पिशियस अॅक्टिव्हिटी रिपोर्टिंग इनिशिएटिव्ह (एन,एस.आय.) चा महत्वपूर्ण भाग.
नागरिकांकडून आलेल्या माहितीचे संकलन, वर्गवारी आणि विश्लेषण करण्याची प्रमाणीकृत पध्दत विकसित करण्यात आल्याने प्रक्रियांना वेग देणे शक्य.
राज्ये, शहरे, काऊंटीज यांच्याबरोबर विमानतळ, सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे आदि सर्वांचा सहभाग.या योजनेमध्ये अधिकृत ’पार्टनर’ होण्यासाठी निवासी संकुले शाळा-कॉलेजे, खेळ-मनोरंजनाचे कार्यक्रम आणि ठिकाणे, खाजगी उद्योगांच्या आस्थापना यांना विशेष प्रोत्साहन
आपल्या आजूबाजुला वावरणारी माणसे, त्यांचे वर्तन-बोलण्या-वागण्यातले विचित्र वाटणारे फरक, न पटणारे व्यवहार (उदा. ओमार मातीनने आपले घर फक्त १० डॉलर्सना आणि तेही आपल्याच बहिणीला विकणे) या साऱ्याबद्दल जागरूक असण्याचे प्रशिक्षण नागरिकांना देण्याबद्दल, त्याविषयी सतर्कता निर्माण करण्याबद्दल इथे चर्चा चालू आहे.
माध्यमांकडूनही बदलांची दखल
माध्यमेही या साऱ्या बदलांची, पुढे
येणाऱ्या पर्यायांची विस्ताराने दखल घेताना दिसतात. ओमारची पत्नी नूर सलमान म्हणते, तो असे काही करणार आहे याचा मला अंदाज होता.