व्हिजा नाकारल्यानं पाक सिनेटचे यूएनच्या कार्यक्रमावर बहिष्कारास्त्र
By admin | Published: February 13, 2017 12:30 PM2017-02-13T12:30:09+5:302017-02-13T12:30:09+5:30
पाकिस्तानी सिनेटच्या उपसभापतीला अमेरिकेनं व्हिजा नाकारल्यानं पाकिस्तानचे खासदार भडकले आहेत.
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 13 - पाकिस्तानी सिनेटच्या उपसभापतीला अमेरिकेनं व्हिजा नाकारल्यानं पाकिस्तानचे खासदार भडकले आहेत. पाकिस्तानी प्रतिनिधींनी अमेरिकेला बॉयकॉट करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानच्या सिनेटचे उपसभापती आणि जमियत उलेमा इस्लमा फज्ल(JUI-F)चे महासचिव मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांना अमेरिकेनं व्हिजा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोन सदस्यांचा प्रस्तावित अमेरिका दौरा रद्द करण्यात आला आहे.
हैदरी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात 13 आणि 14 फेब्रुवारीला होणा-या इंटर पार्लामेंटरी युनियनच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार होते. हैदरी यांचे सहकारी सलाहुद्दीन तिरमिझी यांना अमेरिकेनं व्हिजा मंजूर केला होता. मात्र सिनेट अध्यक्ष रब्बानी यांनी हा दौराच रद्द केला आहे. हैदरी हे कट्टरवादी संघटना JUI-Fशी संबंधित आहेत. अमेरिकेचा जमियत उलेमा इस्लमा फज्लचा JUI-Fला विरोध असल्यानं अमेरिकेनं त्यांना व्हिजा नाकारल्याची आता चर्चा आहे.
सिनेट अध्यक्ष रब्बानी म्हणाले, या मुद्द्यावर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत अमेरिकी शिष्टमंडळ, यूएस काँग्रेस आणि सदस्यांना पाकिस्तानी सिनेटकडून कोणतंही उत्तर देण्यात येणार नाही. तसेच पाकिस्तानकडून व्हिजा नाकारण्याचं अधिकृत कारण दिलं जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानी सेनेटचं प्रतिनिधी मंडळ अमेरिकेच्या दौ-यावर जाणार नाही, असा आदेशच रब्बानी यांनी दिला आहे.