शाही ताफ्यात अडथळा आला तर फाशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2023 11:23 AM2023-07-08T11:23:25+5:302023-07-08T11:25:01+5:30

परंपरा आणि शिरस्त्याप्रमाणे जेव्हा शाही ताफा रस्त्याने जात असतो, तेव्हा त्या मार्गावरील सगळी वाहतूक बंद केली जाते.

Execution if the royal convoy is obstructed? | शाही ताफ्यात अडथळा आला तर फाशी?

शाही ताफ्यात अडथळा आला तर फाशी?

googlenewsNext

१४ ऑक्टोबर २०२०. दुपारची वेळ, थायलंडची राजधानी बँकॉक येथे एक शांततापूर्ण रॅली काढण्यात आली होती. १९७३ मध्ये झालेल्या एका क्रांतीचा वर्धापन दिन मनवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती. याच क्रांतीमुळे सुमारे दशकभर चालेलेल्या लष्करी सैन्याची हुकुमशाही समाप्त झाली होती. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन एक रॅली काढली होती. त्या स्मृती पुन्हा जाग्या केल्या होत्या. या रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. थायलंडच्या पंतप्रधानांचं कार्यालयही याच रस्त्यावर आहे.

ज्यावेळी ही रॅली रस्त्यावरून जात होती, नेमक्या त्याच वेळी थायलंडचे राजे महा वजिरालोंगकॉर्न यांची पत्नी राणी सुथिदा आपल्या १५ वर्षीय राजपुत्र दिपांगकॉर्न रासमिजोती हे त्यांच्या आलिशान कारमधून जात होते. अर्थातच राणीच्या दिमतीला सारा लवाजमा होताच. या शाही ताफ्यासोबत मोठा सुरक्षा बंदोबस्तही असतो. ज्या ज्या मार्गानं ते जात होते, तिथं नेहमीच्या शिरस्त्यानं लोक त्यांना अभिवादन करीत होते, त्यांचं स्वागत करीत होते. नेमकी त्याच वेळी ही रैली त्या मार्गात होती. राणीच्या शाही प्रवासात अडथळा म्हणजे केवढा मोठा गुन्हा!

परंपरा आणि शिरस्त्याप्रमाणे जेव्हा शाही ताफा रस्त्याने जात असतो, तेव्हा त्या मार्गावरील सगळी वाहतूक बंद केली जाते. याच मार्गावरून शाही ताफा जाणार आहे. हे रॅलीतील सहभागी नागरिकांना जसं अनपेक्षित होतं, तसंच ते शाही ताफ्यासाठीही आश्चर्यजनक राणीच्या सुरक्षेसाठी धोकादायक होतं. नेमक्या त्याच वेळी काही तरुण या रैलीतून निघून रस्त्यावर, राणीच्या शाही मर्गावर आले. त्यात २३ वर्षीय तरुण विद्यार्थी बंकुएनन पाओर्थंग याचाही समावेश होता. फ्रान्सिस या टोपणनावानं तो आपल्या मित्रमंडळींमध्ये ओळखला जातो. तो आणि त्याचे चार मित्र रस्त्यावर आले आणि त्यांनी राणीच्या गाडीचा मार्ग अडवला, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला.

आपल्याला वाटेल, शाही ताफ्याच्या मार्गात काही जण आले म्हणजे काही मोठा गुन्हा नाही. त्यांच्यावर काय कारवाई होईल? फारफार तर त्यांना पोलिस ठाण्यात नेतील, थोडी दमबाजी करतील किंवा एखाद-दुसरा दिवस आत ठेवतील आणि सोडून देतील! पण नाही. थायलंडचा कायदा इतका साधा नाही. थायलंडचा राजा, राणी यांचा शाही मार्ग कोणी अडवला, त्यांच्या मार्गात कोणी अडथळे आणले तर त्यांना किमान १५ वर्षे ते मृत्युदंडापर्यंत शिक्षा होऊ शकते! या पाचही आरोपींनी राणीचा मार्गच केवळ अडवला नाही, तर रस्त्यावर येऊन हातवारे केले पोलिसांबरोबर झटापटही केली, असा आरोप त्यांच्यावर आहे. हा तर आणखीच खतरनाक गुन्हा ठरतो. शाही मार्गात पोलिसांशी झटापट म्हणजे राणीच्या जिवालाच धोका!

ज्या दिवशी ही घटना घडली, त्यानंतर आपल्याला आता अटक होऊ शकते, या भीतीनं फ्रान्सिस आणि त्याचे चारही मित्र फरार झाले. त्यानंतर मात्र दोनच दिवसांनी फ्रान्सिस स्वतःहून पोलिसांपुढे हजार झाला. त्याचं म्हणणं होतं, ज्या मर्गावरून आमची रॅली जात होती, तिथे अचानक शाही रॅली आल्यानं आम्ही सारेच गोंधळलो. काय करावं कोणालाच काही सुचेना. अशा वेळी मी रस्त्याच्या मध्यभागी आलो, हातवारे करून रॅलीला आणि त्यातील लोकांना बाजूला केलं. माझ्या मदतीला आणखी चार तरुण आले. शाही ताफ्याला अडवण्याचा किंवा त्यांचा मार्ग रोखण्याचा आमचा कोणताही इरादा नव्हता आणि त्यांचा मार्ग आम्ही अडवलाही नाही.

सोशल मीडियावरही या घटनेचे, या शाही ताफ्याचे जे फोटो व्हायरल झाले आहेत, त्यात कुठेही या चौघांनी पोलिसांशी झटापट केल्याचं दिसून येत नाही; पण त्यांच्यावर तो आरोप मात्र लागला होता. शाही ताफ्याला अडवण्याबद्दल फाशीची शिक्षा देण्याची जी तरतूद थायलंडच्या कायद्यात आहे. त्याचा आजवर वापर झालेला नाही, असा प्रसंगही याआधी तिथे उद्भवलेला नाही; पण या तरुणांच्या डोक्यावर मात्र मृत्यूची टांगती तलवार कायम होती. अनेक तज्ज्ञांनी, वकिलांनीही यासंदर्भात हेच मत व्यक्त केलं होतं. त्यामुळं हे पाचही तरुण आणि त्यांचे नातेवाईक कालपर्यंत अक्षरश: जीव मुठीत घेऊन बसलेले होते.

खरंच मी जिवंत आहे?
थायलंडच्या न्यायालयानं मात्र अनपेक्षित निर्णय दिला आणि या पाचही तरुणांना निर्दोष मुक्त केलं. त्यामुळे केवळ हे तरुण आणि त्यांचे कुटुंबीयच नाही, तर देशवासीसुद्धा आनंदित झाले आहेत. फ्रान्सिसनं तर रडत रडतच सांगितलं. मी जिवंत आहे आणि राहील, यावर माझा विश्वासच बसत नाही. कारण गेल्या अडीच वर्षांत ज्या तणावात मी एक एक दिवस काढला त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. कालबाह्य झालेले शाही कायदे आता तरी बदलावेत, असा आग्रह मात्र या देशातील तरुणाईन धरला आहे.

Web Title: Execution if the royal convoy is obstructed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.