कराची विमानतळावरील दहशतवाद्यांचे तांडव संपुष्टात
By admin | Published: June 9, 2014 05:04 PM2014-06-09T17:04:37+5:302014-06-09T17:57:10+5:30
पाकिस्तानमधील कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दहशतवाद्यांचे तांडव अखेर संपुष्टात आले असून या हल्ल्यात १० दहशतवाद्यांसह २८ जणांचा मृत्यू झाला.
Next
>ऑनलाइन टीम
कराची, दि. ९- पाकिस्तानमधील कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दहशतवाद्यांचे तांडव अखेर संपुष्टात आले असून या हल्ल्यात १० दहशतवाद्यांसह २८ जणांचा मृत्यू झाला. लवकरच या विमानतळावरील सेवा पूर्ववत करण्यात येईल असे पाकिस्तानमधील सुरक्षा अधिका-यांनी सांगितले.
रविवारी रात्री १० सशस्त्र दहशतवाद्यांनी जिना विमानतळावर हल्ला केला होता. पाच - पाच जणांच्या दोन गटात हे दहशतवादी विमानतळाच्या परिसरात लपून बसले होते. पाकिस्तानी सैन्य, निमलष्करी जवान, विमानतळ सुरक्षा दल आणि पोलिसांनी या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. रात्रभर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता. सहा तासांच्या चकमकीनंतर पाकिस्तानी सुरक्षा दलाला सर्व १० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. या चकमकीत सुरक्षा दलाच्या १७ जवानांसह विमानतळावरील एका इंजिनिअरचा मृत्यू झाला.या हल्ल्यात २४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर कराचीतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दहशतवाद्यांकडून पोलिसांनी अत्याधुनिक मशिनगन, ग्रेनेड, रॉकेट लाँचरही जप्त केल्याची माहिती पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी दिली. १० पैकी तीन दहशतवाद्यांनी आत्मघाती बाँबस्फोट घडवून स्वतःला संपवले. तर उर्वरित सात दहशतवादी चकमकीत मारले गेले. विमानतळ ताब्यात घेणे व सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे हाच त्या दहशतवाद्यांचा प्रमुख उद्देष होता असे पाकिस्तान सैन्याचे मेजर जनरल रिजवान अख्तर यांनी सांगितले.
विमानतळ सुरक्षित
रात्रभर सुरु असलेल्या या चकमकीत सात वेळा शक्तिशाली बाँबस्फोटांचे आवाज आले. विमानतळाच्या एका भागातून धूरही येत होता. मात्र या संपूर्ण हल्ल्यात एकाही विमानाचे नुकसान झाले नसून विमानतळ परिसर सुरक्षित असल्याचे विमानतळावरील अधिका-यांनी स्पष्ट केले.या हल्ल्यामुळे विमानतळावर विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. तर काही विमानांचे मार्ग बदलावे लागले. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यावर सोमवारी सकाळी पुन्हा विमानतळाच्या परिसरात गोळीबार सुरु असल्याचा आवाज येत होता. सुरक्षा दलाने संपूर्ण विमानतळ पिंजून काढला असून आता विमानतळाच्या परिसरात दहशतवादी नाहीत असेही विमानतळावरील अधिका-यांनी स्पष्ट केले. लवकरच सुरक्षा दलाच्या ताब्यातून हे विमानतळ पुन्हा एकदा नागरी हवाई वाहतूक विभागाला सोपवले जाईल असे मेजर जनरल अख्तर यांनी सांगितले.
तहरिक ए तालिबानने स्वीकारली जबाबदारी
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तहरिक ए तालिबान या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. संघटनेचा प्रवक्ता शाहीदुल्ला शाहीद याने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तालिबानचा माजी प्रमुख हकीमुल्ला महसूद याचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला होता. याचा बदला घेण्यासाठी कराची विमानतळावर हल्ला केल्याचे शाहीदने सांगितले. गावांवर ड्रोन हल्ला करुन निष्पाप गावक-यांचे जीव घेणा-या पाकिस्तान सरकारशी आम्ही प्रत्येक सेकंदाचा बदला घेऊ. ही तर फक्त सुरुवात आहे असा इशाराच शाहीदने पाक सरकारला दिला आहे.
दहशतवाद्यांकडे जखम भरण्याचे आधूनिक साधन
या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दहशतवाद्यांकडे एक्स टेस्ट हे आधूनिक उपकरण आढळले आहे. या उपकरणामुळे अवघ्या काही सेकंदांमध्ये बंदूकीची गोळी लागल्याने होणारी जखम अवघ्या काही सेकंदांमध्ये भरुन निघते. जास्तीत जास्त वेळ विमानतळ दहशतवाद्यांच्या ताब्यात राहावे यासाठीच त्यांनी हे उपकरण ठेवले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. विमानतळावर प्रवेश करण्यासाठी या दहशतवाद्यांनी विमानतळ सुरक्षा दलाच्या जवानांचा वेष धारण केला होता. विशेष म्हणजे यासाठी दहशतवाद्यांनी बनावट ओळखपत्र तयार केल्याचे समजते. सध्या या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.