खासींचे अस्तित्व इ.स.पूर्व १२०० पासून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 12:44 AM2016-07-12T00:44:55+5:302016-07-12T00:44:55+5:30
मेघालयातील खासी ही जमात इ.स.पूर्व १२०० पासून अस्तित्वात आहे. री-भोई जिल्ह्यात मिळालेल्या प्राचीन शिळा याची साक्ष देतात
शिलाँग : मेघालयातील खासी ही जमात इ.स.पूर्व १२०० पासून अस्तित्वात आहे. री-भोई जिल्ह्यात मिळालेल्या प्राचीन शिळा याची साक्ष देतात. येथील काही औजारेही हे संकेत देतात की, राज्यातील सर्वात मोठ्या जमातींपैकी एक असणाऱ्या खासी जमातीला मोठा इतिहास आहे.
पुरातत्त्ववेत्ता मार्को मित्री आणि नॉर्थ ईस्टर्न हिल्स युनिव्हर्सिटीचे शिक्षक यांच्या एका दलाने एनएच-४० जवळ सोहपेटबनेंगच्या लुमावबुह गावात एका जागेची पाहणी केली. त्यानंतर येथे खोदकाम करण्यात आले. याबाबत बोलताना मित्री म्हणतात की, आम्हाला येथून शिळा आणि लोखंडाच्या काही वस्तू आढळून आल्या. हा पहाडी भाग दीड कि.मी. भागात पसरलेला आहे. येथील २० औजारे आणि अन्य साहित्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याच्या अहवालानुसार हे साहित्य १२ व्या शतकातील आहे. आदिवासींच्या प्रथेशी नाते सांंगणाऱ्याही काही वस्तू यात आहेत. २००४ मध्ये प्रथम याचा शोध लागला; पण या संशोधनाची खात्री करण्यासाठी किमान दहा वर्षांचा कालावधी लागला आहे. २०० वर्षांपूर्वी या भागात वस्ती असल्याच्या खुणा मिळाल्या आहेत. ब्रिटिश आर्कियोलॉजीकल रिपोर्टस्ने २००९ मध्ये मित्री यांचे 'आऊटलाईन आॅफ नियोलिथिक कल्चर आॅफ खासी अॅण्ड जैन्तिया हिल्स' हे संशोधन प्रसिद्ध केले होते. (वृत्तसंस्था)