मंगळ ग्रहावर प्राणवायूचे अस्तित्व; नासाच्या मोहिमेला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 06:16 AM2021-04-23T06:16:19+5:302021-04-23T06:17:10+5:30
पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या या ग्रहावर सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त ठरणारा ऑक्सिजन अर्थात प्राणवायू असल्याचे पुरावे आढळून आले आहेत.
वॉशिंग्टन : संपूर्ण जग कोरोनाच्या कहरात बुडून गेले असताना मंगळ ग्रहावरून एक सुवार्ता आली आहे. पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या या ग्रहावर सजीवांना जगण्यासाठी उपयुक्त ठरणारा ऑक्सिजन अर्थात प्राणवायू असल्याचे पुरावे आढळून आले आहेत. अमेरिकेच्या नासा या संस्थेने पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हर या यानाने ही कामगिरी केली आहे.
कशी साधली कामगिरी
n पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळ ग्रहावरील कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ५.३७ ग्रॅम ऑक्सिजन संकलित केला.
n रोव्हरमधील टोस्टरच्या आकाराच्या यंत्राने ही कामगिरी केली.
n या यंत्राचे पूर्ण नाव मार्स ऑक्सिजन इन-सीटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट (मॉक्सी) असे आहे.
कसा आहे ऑक्सिजन
नासाच्या स्पेस टेक्नॉलॉजी मिशन डायरोक्टेरेटचे प्रशासक जिम रियूटर यांच्या मते मंगळ ग्रहावरील वायूमंडळ अतिशय हलके आणि पातळ आहे.
n कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ऑक्सिजन संकलित करणे अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु मॉक्सीने ही कामगिरी केली.
n अंतराळवीरांना हा ऑक्सिजन दिला तर ते किमान १० मिनिटे तग धरू शकतात, एवढा प्रभावी हा ऑक्सिजन आहे.
n अंतराळवीरांना जर एक वर्ष मंगळ ग्रहावर रहायचे असेल तर त्यांना १००० किलोग्रॅम एवढा ऑक्सिजन लागेल.
मानवी वस्ती शक्य : नासाने मंगळ ग्रहावर इंजिन्युटी हेलिकॉप्टर उडवले आणि त्याच्या पोटातून बाहेर आलेल्या मॉक्सीने मंगळाच्या वातावरणातून ऑक्सिजनचे संकलन केले. मंगळ ग्रहावर ऑक्सिजन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी मानवी वस्ती करणे शक्य आहे. या ऑक्सिजनचा वापर तिकडून पृथ्वीवर परत येणाऱ्या यानात इंधनाच्या रूपाने केला जाऊ शकतो. अंतराळवीरांना मंगळाच्या वातावरणातून किमान श्वास घेता येऊ शकेल एवढा ऑक्सिजन संकलित करता येऊ शकेल.