३ कोटी युजर्सची गोपनीय माहिती उघड
By admin | Published: August 20, 2015 11:11 PM2015-08-20T23:11:47+5:302015-08-20T23:11:47+5:30
सुरक्षा भेदत हॅकर्सनी अॅश्ले मॅडिसन या वेबसाईटवर हल्ला चढवीत ३.७ कोटी युजर्सची नावे, पत्ते, ई-मेल, वय आणि फोन नंबरसह इत्थंभूत गोपनीय माहिती इंटरनेटवर
लंडन : सुरक्षा भेदत हॅकर्सनी अॅश्ले मॅडिसन या वेबसाईटवर हल्ला चढवीत ३.७ कोटी युजर्सची नावे, पत्ते, ई-मेल, वय आणि फोन नंबरसह इत्थंभूत गोपनीय माहिती इंटरनेटवर जारी केल्याने खळबळ उडाली आहे. हॅकर्सच्या या सायबर हल्ल्यामुळे पुन्हा एकदा सायबर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अॅश्ले मॅडिसन वेबसाईटची टॅगलाईन ‘लाईफ इज शॉट, हॅव अॅन अफेअर’ आहे. ही वेबसाईट सर्रास नातेसंबंधातील विश्वासाला तिलांजली देत स्वैराचारासाठी जोडीदार शोधण्यास मदत करते.
हॅकर्सनेही ही सर्व गोपनीय माहिती डार्क वेबवर टाकली आहे. टॉर ब्राऊझरवर ही माहिती पाहता येते. अमेरिकेची फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हीस्टेशन ही संस्था या प्रकरणी चौकशीला लागली आहे. अॅश्ले मॅडिसन डॉट कॉमच्या सदस्यांची गोपनीय माहिती उघड करणारे हे गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कृत्य आहे, असे अॅव्हिड लाईफ मीडियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले. या कृत्यामागील लोक स्वत:ला नैतिकतेचे रक्षक समजून स्वत:ची मते लादू पाहत आहेत, असेही अॅव्हिड लाईफ मीडियाने म्हटले आहे. २००१ मध्ये कॅनडाचे नोएल बिडरमन यांनी ही वेबसाईट सुरू केली. मालकी टोरोन्टोतील अॅव्हिड लाईफ मीडियाची आहे. या प्रकरणी आम्ही कॅनडा आणि अमेरिकेतील पोलीस आणि कायदा अंमल प्रशासनाच्या संपर्कात आहोत, असे अॅव्हिड लाईफ मीडियाने निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)