‘आॅपरेशन ब्लू स्टार’मधील ब्रिटनची भूमिका स्पष्ट करा : लेबर पार्टी
By admin | Published: November 6, 2016 12:59 AM2016-11-06T00:59:33+5:302016-11-06T00:59:33+5:30
आॅपरेशन ब्लू स्टार’मध्ये ब्रिटनची काय भूमिका होती याबाबत पंतप्रधान टेरेसा मे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीने
लंडन : ‘आॅपरेशन ब्लू स्टार’मध्ये ब्रिटनची काय भूमिका होती याबाबत पंतप्रधान टेरेसा मे यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या लेबर पार्टीने केली आहे. टेरेसा मे या उद्यापासून (रविवार) तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर जात आहेत.
‘आॅपरेशन ब्लू स्टार’मधील ब्रिटनचा सहभाग सिद्ध करणाऱ्या नव्या पुराव्यांची फाईल परराष्ट्र मंत्रालयाने काढून टाकल्याचा आरोप तेथील शीख फेडरेशन केला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील शीख समाजाला सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे, असे लेबर पार्टीचे उपनेते टॉम वॉटसन यांनी शुक्रवारी म्हटले. भारताने जून १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर ‘आॅपरेशन ब्लू स्टार’ लष्करी कारवाई केली होती.
तत्कालीन मार्गारेट थॅचर सरकारने भारत सरकारसोबत अधिक निकटतेने काम केल्याचे पुरावे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यावर जाण्यापूर्वी टेरेसा मे यांनी सुवर्ण मंदिर कारवाईबाबत स्पष्टीकरण दिलेच पाहिजे, असे वॅटसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
‘आॅपरेशन ब्लू स्टार’दरम्यान अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथक स्थापन करायचे होते. भारताने लष्करी साहाय्य मागितल्यानंतर ब्रिटिश लष्कराच्या विशेष हवाई सेवा दल सहभागी झाल्याच्या शक्यतेचे संकेत देणाऱ्या फाइल्स परराष्ट्र मंत्रालयाने हेतुपुरस्सर हटविल्या, असा दावा वॉटसन यांनी त्यांच्या निवेदनात केला आहे. (वृत्तसंस्था)
लेबर पार्टीने म्हटले की, फायली अस्तित्वात असल्याची वस्तुस्थितीच मुळी अनेक प्रश्न उपस्थित करते. डेव्हिड कॅमेरून सरकारच्या चौकशीतून वस्तुस्थितीचा उलगडा होत नसून, हत्याकांडाबाबतचे नवे दस्तऐवज हटविण्यात आल्याचे आता आम्हाला कळाले आहे.