रासायनिक हल्ल्याने सीरियात युद्धगुन्हे सुरू असल्याचे स्पष्ट

By admin | Published: April 6, 2017 04:24 AM2017-04-06T04:24:28+5:302017-04-06T04:24:28+5:30

संशयित रासायनिक अस्त्रांच्या हल्ल्याच्या घटनेने सीरियात युद्धगुन्हे सुरूच असल्याचे दिसून आले

Explaining that chemical attacks are ongoing in Syria, war crimes are going on | रासायनिक हल्ल्याने सीरियात युद्धगुन्हे सुरू असल्याचे स्पष्ट

रासायनिक हल्ल्याने सीरियात युद्धगुन्हे सुरू असल्याचे स्पष्ट

Next

ब्रसेल्स : संशयित रासायनिक अस्त्रांच्या हल्ल्याच्या घटनेने सीरियात युद्धगुन्हे सुरूच असल्याचे दिसून आले, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अ‍ॅन्टोनिया गुटेरेज यांनी बुधवारी म्हटले आहे. संशयित रासायनिक हल्ल्यातील मृतांची संख्या बुधवारी वाढून ७२ झाली असून, मृतांत २० बालकांचा समावेश आहे, अशी माहिती एका निरीक्षण गटाने दिली. मृतांत १७ महिलांचा समावेश आहे. अनेक जण बेपत्ता असल्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असे सीरियन आॅब्झर्वेटरी फॉर ह्युमन राइट्सने सांगितले.
सीरियात युद्धगुन्हे सुरू असून, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे कालच्या भयानक घटनेतून दिसून आले, असे गुटेरेस म्हणाले. सीरिया मदत परिषदेसाठी ते येथे आले
आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ अशा
गुन्ह्यांची जबाबदारी निश्चित
करू इच्छितो. सुरक्षा परिषद यासंदर्भातील आपली जबाबदारी पार पाडेल, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
रशियाने सीरियाची यावेळीही पाठराखण केली. सीरियन लढाऊ विमानाने दहशतवाद्यांच्या दारूगोळा कोठाराला लक्ष्य केल्यानंतर ही घटना घडली. या कोठारात रासायनिक अस्त्रे होती, असा दावा रशियाने केला आहे. रासायनिक अस्त्रांचा हा साठा इराकमध्ये लढत असलेल्या दहशतवाद्यांना पाठविण्यात येणार होता. ही माहिती विश्वसनीय आणि वस्तुनिष्ठ आहे, असेही रशियाने सांगितले. सुरक्षा परिषदेत नकाराधिकाराचा हक्क असलेल्या रशियाचा सीरियातील बशर अल असद सरकारला पाठिंबा आहे.
सीरियाच्या लढाऊ विमानाने इडलिब प्रांतातील खान शेखून शहरावर (हे शहर बंडखोरांच्या ताब्यात आहे.) केलेल्या हल्ल्यात ७२ जणांचा बळी गेला होता. या हल्ल्यासाठी रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचा संशय आहे. बंडखोरांनी या हल्ल्याचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली आहे.
>हा ओबामाच्या दुर्बलतेचा परिणाम
सीरियातील संशयित रासायनिक हल्ला निंदनीय असून, ओबामा प्रशासनाच्या धोरणातील त्रुटींचा परिपाक आहे, असे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. निरपराध लोकांवर झालेल्या या हल्ल्याकडे जग दुर्लक्ष करू शकत नाही.
बशर अल असाद सरकारचे हे घृणास्पद कृत्य मागील सरकारची दुर्बलता आणि धरसोडपणाचा परिपाक आहे, असेही ट्रम्प म्हणाले. रासायनिक अस्त्रांच्या वापराविरुद्ध आपण कठोर पावले उचलू, असे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१२ मध्ये म्हटले होते. मात्र, त्यांनी काहीही केले नाही, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
हल्ल्यामागे असद
यांचा हात - ब्रिटन
सर्व पुरावे संशयित रासायनिक हल्ल्यामागे सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचा हात असल्याचे संकेत देत आहेत, असे ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी म्हटले. मी जेव्हढेही पुरावे पाहिले आहेत ते सर्व असद यांच्याकडे बोट दाखवीत आहेत, असे जॉन्सन म्हणाले. या सर्व बाबी असद सरकार एक खतरनाक सरकार असल्याचे सिद्ध करतात. त्यामुळे या संघर्षानंतर सीरियावर राज्य करण्याचा त्यांना अधिकार उरल्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले.
चौकशीची मागणी
सीरियातील हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारा मसुदा ठराव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने सुरक्षा परिषदेला सादर केला आहे. तिन्ही देशांनी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करत जबाबदार लोकांना कडक शासन करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Explaining that chemical attacks are ongoing in Syria, war crimes are going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.