पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी
By admin | Published: October 4, 2015 11:31 PM2015-10-04T23:31:14+5:302015-10-04T23:31:14+5:30
आपला देशच दहशतवादाचा बळी ठरला असून, पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रात करीत असताना जवळपास
वॉशिंग्टन : आपला देशच दहशतवादाचा बळी ठरला असून, पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असल्याचा आरोप देशाचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रात करीत असताना जवळपास त्याचवेळी दहशतवाद्यांशी कथित संबंध असलेल्या दोन कॅनेडियन नागरिकांची कॅनडाने पाकिस्तानात हकालपट्टी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आपल्या देशाला या पाकिस्तानी नागरिकांकडून मोठा धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवून कॅनेडियन सरकारने या दोघांना विमानात बसवून पाकिस्तानला धाडल्याचे कॅनडातील एका दैनिकाने म्हटले आहे.
पाकिस्तानी नागरिकांची कॅनडातून झालेली ही हकालपट्टी असाधारण नाही. कारण जवळपास याच काळात जगाच्या विविध भागांतून पाकिस्तानी नागरिकांवर अशी कारवाई करण्यात आली. या प्रकरणात हकालपट्टी झालेले पाकिस्तानी नागरिक कायमस्वरूपी कॅनडात राहत होते, हे विशेष. या दोघांना येथे वास्तव्यासाठी देण्यात आलेला व्हिसा रद्द करून त्यांना अक्षरश: इस्लामाबादला जाणाऱ्या विमानात कोंबण्यात आले, असे कॅनडाच्या ‘नॅशनल पोस्ट’ या दैनिकाने म्हटले आहे.
कॅनडातील स्टिफन हार्पर सरकारने दहशतवादाशी संबंधित एक वादग्रस्त कायदा संमत केला होता. त्या कायद्यानुसार प्रथमच अशी कारवाई करण्यात आली आहे.
जहांजजेब मलिक आणि मोहंमद अकिक अन्सारी, अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही पाकिस्तानात जन्मलेले असून, प्रदीर्घ काळापासून त्यांचे येथे वास्तव्य होते.
पाकिस्तान हे दहशतवाद्यांसाठी अड्डा बनत आहे, हे जगाला माहीत आहे. तेथील दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया, त्या देशाची ढासळती प्रतिमा यामुळे पाकिस्तानातील अनेक नागरिक अमेरिका आणि कॅनडात वास्तव्यास आले आहेत; पण पाकिस्तानचे धोरण सरकार नव्हे, तर लष्कर ठरवीत असल्याने त्यांची प्रतिमा आणखी बिघडत आहे. (वृत्तसंस्था)