इसिसविरोधात कारवाईसाठी व्यापक व्यूहरचना - डोनाल्ड ट्रम्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2017 12:50 AM2017-01-30T00:50:22+5:302017-01-30T00:50:22+5:30
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेला नष्ट करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला व्यापक व्यूहरचना ३० दिवसांत करण्याचा आदेश रविवारी दिला.
वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेला नष्ट करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्कराला व्यापक व्यूहरचना ३० दिवसांत करण्याचा आदेश रविवारी दिला.
या व्यूहरचनेमुळे अमेरिका इसिसविरोधात निर्णायक पाऊल उचलू शकेल. अमेरिका तोंड देत आहे तो मूलतत्ववादी इस्लामी दहशतवाद एवढाच इसिसचा धोका नाही तर ती खूपच विषारी आणि आक्रमक संघटना आहे. ती स्वत:चे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या संघटनेत चर्चेला, वाटाघाटींना जागा नाही, असे ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले.
वरील कारणांसाठीच मी माझ्या प्रशासनाला इसिसविरोधात व्यापक व्यूहरचना तयार करण्याचा आदेश दिल्याचे ते म्हणाले.
...तर दहशतवाद्यांची शक्ती वाढेल
अमेरिकेच्या सध्याच्या धोरणांच्या वा नियमांच्या बंधनांमुळे इसिसविरोधात व्यापक कारवाई करण्यात अडथळा येत असल्यास त्यात बदल करण्यास या व्यूहरचनेद्वारे सूचवले जाईल.हा अहवाल ३० दिवसांत ट्रम्प यांना सादर करायचा आहे. इसिसला शक्ती मिळत राहिली तर त्यामुळे जो धोका निर्माण झाला आहे तो वाढतच जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.