भारतीय ख्रिश्चन प्रिस्टना लवकरच सोडवू- परराष्ट्र मंत्री
By admin | Published: April 3, 2016 02:35 PM2016-04-03T14:35:05+5:302016-04-03T14:36:25+5:30
ख्रिश्चन प्रिस्ट सुरक्षित असून, त्यांना लवकरच मुक्त करण्यात येणार असल्याचं सीबीसीआय या भारतीय कॅथलिक परिषदेनं सांगितलं
येमेन, दि. 03- येमेनमध्ये भारतीय ख्रिश्चन प्रिस्टचं गेल्या महिन्यात अपहरण झालं होतं. ते ख्रिश्चन प्रिस्ट सुरक्षित असून, त्यांना लवकरच मुक्त करण्यात येणार असल्याचं सीबीसीआय या भारतीय कॅथलिक परिषदेनं सांगितलं आहे. दक्षिण येमेनमधल्या अडेन या शहरातून फादर टॉम यांचं अपहरण झालं होतं. बंदुकधारी दहशतवाद्यांनी त्यावेळी जवळपास 15 लोकांना ठार केलं होतं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी या हल्ल्याचा निषेधही नोंदवला होता. सीबीसीआय या भारतीय कॅथलिक परिषदेनं फादर टॉम यांच्या सुरक्षिततेसाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. भारत सरकार ख्रिश्चन प्रिस्टना सुरक्षितरीत्या भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही यावेळी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी फादर जोसेफ चिन्नायन यांना सांगितलं आहे. फादरना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली आहे, असं फादर जोसेफ यांनी यावेळी सांगितलं.
मात्र प्रसिद्धीमाध्यमांनी मागच्या आठवड्यात इसिसच्या दहशतवाद्यांनी फादर यांची हत्या केल्याचं वृत्त दिलं होतं. आणि गेल्या महिन्यात चार भारतीय ननच्या झालेल्या हत्येचीही अद्याप कोणी जबाबदारी स्वीकारली नाही आहे.