अंतर्गत प्रश्नांत बाह्य हस्तक्षेप मान्य नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 04:20 AM2019-09-05T04:20:52+5:302019-09-05T04:22:05+5:30
मोदींनी नाव न घेता पाकिस्तानला फटकारले; पुतीन यांची गळाभेट
व्लादिवोस्तोक (रशिया) : देशाच्या अंतर्गत प्रश्नांत बाह्य शक्तींचा हस्तक्षेप आम्हा दोन्ही राष्ट्रांना मान्य नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषदेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या साक्षीने सांगत पाकिस्तानला फटकारले. दरम्यान, या दोन नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तेल व गॅस, अणुऊर्जा, संरक्षण आणि समुद्री संपर्क यात सहकार्य करण्यावर चर्चा केली.
काश्मिरातील कलम ३७० हटविल्यानंतर भारत- पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला स्पष्टपणे सांगितले आहे की, कलम ३७० च्या बहुतांश तरतूदी समाप्त करणे हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. तथापि, रशियाने काश्मिर मुद्यावर भारताच्या निर्णयाचे समर्थन केलेले आहे आणि सांगितले की, काश्मिरच्या दर्जातील परिवर्तन भारतीय राज्यघटनेला अनुसरुनच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत ज्वेज्दा जहाज बांधणी कॉम्प्लेक्सचा दौरा केला आणि येथील व्यवस्थापन आणि अन्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. पुतीन यांनी मोदी यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. दोन दिवसांच्या रशिया दौºयावर असलेल्या मोदी यांनी राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केली. रशियाच्या पूर्व भागात दौरा करणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. ज्वेज्दा जहाज बांधणी कॉम्प्लेक्स येथे जाण्यापूर्वी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली.
जहाज बांधणी कॉम्प्लेक्सचा दौरा केल्यानंतर मोदी म्हणाले की, जहाज बांधणी क्षेत्रात रशिया-भारताचे संबंध मजबूत होत आहेत.
विजय दिवस समारंभाचे मोदींना निमंत्रण
‘द ग्रेट पेट्रिओटिक वॉर’मधील विजयाच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित २०२० मधील मॉस्कोतील समारंभासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. ब्रिक्स संमेलनात मोदी यांच्याशी भेटण्याची योजना असल्याचे पुतीन यांनी यावेळी सांगितले. रशियातील पूर्व भागातील बंदराचे शहर व्लादिवोस्तोकमध्ये ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’मध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी मोदी यांचे आभार मानले. व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक क्षेत्र, सैन्य आणि तंत्रज्ञान संबंध, शिक्षण व संस्कृतीसह द्विपक्षीय संबंधांबाबत सहमती झाली, असे पुतीन यांनी सांगितले.