काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ नको
By admin | Published: February 3, 2016 02:51 AM2016-02-03T02:51:57+5:302016-02-03T02:51:57+5:30
काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ देण्याचे सरकारने टाळावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी काश्मीरमधील हल्ल्यांत सहभागी असलेल्या गटांवर कारवाई करावी,
इस्लामाबाद : काश्मीरमधील अतिरेकी गटांना ‘प्रोत्साहन’ देण्याचे सरकारने टाळावे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी काश्मीरमधील हल्ल्यांत सहभागी असलेल्या गटांवर कारवाई करावी, असे पाकिस्तानच्या संसदीय समितीने म्हटले आहे.
नॅशनल असेम्ब्लीच्या स्थायी समितीने (परराष्ट्र व्यवहार) सोमवारी काश्मीरशी संबंधित आपले चार पानी धोरण प्रसिद्धीस दिले, त्यात वरील सूचना करण्यात आली आहे, असे ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने वृत्त दिले. पाकिस्तान सरकारने काश्मीरमधील अतिरेकी, सशस्त्र, बंदी घातलेल्या गटांना प्रोत्साहन द्यायला नको, असे या समितीने म्हटले आहे. समितीने भारत-पाकिस्तान संबंधांवर अनेक धोरणात्मक सूचना केल्या आहेत. पाकमधून भारताविरुद्ध कारवाया करणाऱ्या गटांवर कारवाई करण्याची भारताची सतत मागणी आहे.
या समितीचे प्रमुख पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाज शरीफ) नॅशनल असेम्ब्ली सदस्य अवैज अहमद लेघारी आहेत. या समितीने काश्मीरमधील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या गटांवर पाकिस्तान पुरेशी कारवाई करीत नाही ही आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होणारी काळजी दूर करण्यासाठी हिंसक सशस्त्र संघटनांविरुद्ध कारवाई केली पाहिजे, अशी शिफारस केली आहे. पाकिस्तानचे भारताबाबतचे धोरण हे देवाणघेवाण, कपात करणे, फेरसुरुवात आणि निकाल या चार महत्त्वाच्या तत्त्वांवर आधारित हवेत. भारताशी संबंधित प्रलंबित असलेल्या प्रश्नांबाबत संबंध ठेवले पाहिजेत, असेही समितीचे म्हणणे आहे.
या वरील चार तत्त्वांवर अपेक्षित प्रगती होऊ शकली नाही, तर पाकिस्तान सरकारने भारताशी काश्मीर, पाणी, व्यापार आणि संस्कृती आणि दूरसंचार या महत्त्वाच्या विषयावर संबंध ठेवले पाहिजेत, अशी समितीची सूचना आहे.