पॉर्न पाहण्यासाठी द्यावा लागेल फेस स्कॅनिंग सेल्फी; ब्रिटनमध्ये तयार झाले कठोर नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 07:30 AM2023-12-06T07:30:00+5:302023-12-06T07:30:28+5:30
सरकारचे हे पाऊल चुकीचे असल्याची टीका तज्ज्ञ करत आहेत. यातून फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
लंडन - ब्रिटनमध्ये माध्यमे आणि संवाद नियामक प्राधिकरण ऑफकॉमने पॉर्न वेबसाइट पाहणाऱ्यांसाठी ६ नवीन आणि कठोर नियम केले आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील व्यक्ती अशा वेबसाइटला भेट देऊ शकत नाहीत, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवीन नियमांपैकी एक म्हणजे वेबसाइट उघडण्यापूर्वी वापरकर्त्याला फेस स्कॅनिंग सेल्फी घ्यावा लागेल.
सरकारचे हे पाऊल चुकीचे असल्याची टीका तज्ज्ञ करत आहेत. यातून फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, यामुळे पॉर्न वेबसाइट वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर करतील, यापूर्वीही ते असेच करत आले आहेत.
ऑफकॉमने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात नवीन नियमांची माहिती दिली आहे.
फोटो आयडी मॅचिंग...
यासाठी फोटो आयडी मॅचिंग आवश्यक असेल. मुलांना पोर्नोग्राफीच्या जाळ्यापासून वाचवणे हा याचा उद्देश आहे. वापरकर्त्याने फोटो आयडी जुळण्यासाठी पासपोर्ट अपलोड केला, तर त्याचे वय फेस स्कॅनिंग सेल्फीद्वारे तपासले जाईल. वापरकर्ता प्रत्यक्षात तीच व्यक्ती आहे का हेदेखील ठरवले जाईल.
वेबसाइट्सवरही लगाम
ऑनलाइन सुरक्षा कायद्यांतर्गत नवीन नियम करण्यात आले आहेत. यामध्ये आता पोर्नोग्राफीक वेबसाइट्ससह वापरकर्त्याची जबाबदारीही निश्चित करण्यात आली आहे. जेव्हा वापरकर्ता त्याचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असल्याचे सिद्ध करेल तेव्हाच त्याला वेबसाइट्स उघडण्याची परवानगी मिळू शकेल.