'फेसबुकचं चुकलं; स्वतःचं नाव खराब केलं'; न्यूज फीडमधील बातम्या अचानक बंद केल्यानं ऑस्ट्रेलियानं फटकारलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 11:36 AM2021-02-18T11:36:35+5:302021-02-18T12:08:07+5:30
संसदेत आलेल्या कायद्यामुळे फेसबुककडून ऑस्ट्रेलियातील न्यूज पब्लिशर्सची पेजेस ब्लॉक; सरकारी विभागांनादेखील फटका
मेलबर्न: बातम्या दाखवण्यासाठी पैसे द्यावे लागणार असल्याचा कायदा करण्यात आल्यानं फेसबुकनं ऑस्ट्रेलियात वृत्त संकेतस्थळांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध घातले आहेत. फेसबुकनं उचललेल्या या पावलाचा फटका हवामान, आरोग्य विभागासह पश्चिम ऑस्ट्रेलियातल्या विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना बसला आहे. इतकंच नव्हे, तर फेसबुकनं ऑस्ट्रेलियात स्वत:चं पेजदेखील ब्लॉक केलं आहे. फेसबुकनं घेतलेल्या निर्णयाचा फटका आपत्कालीन सेवांना बसला आहे. त्यामुळे अनेकांनी फेसबुकवर टीका केली आहे. सध्या ऑस्ट्रेलियात फेसबुकला मोठ्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.
Apple ला टक्कर देण्यासाठी Facebook ही स्मार्टवॉच लाँच करण्याच्या तयारीत, असे असतील फीचर्स
''फेसबुकची कारवाई अयोग्य आणि अनावश्यक''
फेसबुककडून करण्यात आलेली कारवाई चुकीची असून अशा कारवाईची कोणतीही आवश्यकता नव्हती, अशी टीका खजिनदार जॉश फ्रायडनबर्ग यांनी केली आहे. फेसबुकनं अशा प्रकारची कारवाई करून ऑस्ट्रेलियातील स्वत:च्याच प्रतिष्ठेला धक्का दिल्याचं फ्रायडनबर्ग पत्रकार परिषदेत म्हणाले. 'नव्या कायद्यामुळे गुगल आणि फेसबुकला स्थानिक न्यूज पब्लिशर्सना पैसे द्यावे लागतील. या संदर्भात आमची फेसबुकसोबत चर्चा सुरू होती. मात्र ही चर्चा सुरू असताना, त्यातून काहीतरी ठोस उपाय निघेल असं वाटत असताना फेसबुककडून कारवाई करण्यात आली. फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता हे पाऊल उचललं,' असा आक्षेप त्यांनी नोंदवला.
Australia’s government condemns Facebook over its shocking move to prevent Australians from sharing news that also blocked some government communications and commercial pages. https://t.co/h96DceJnMC
— The Associated Press (@AP) February 18, 2021
सर्वच स्तरांमधून फेसबुकचा निषेध
फेसबुककडून करण्यात आलेल्या कारवाईचा माध्यमं, राजकीय नेत्यांसह मानवाधिकार कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला आहे. फेसबुकनं पेजेस ब्लॉक केल्यानं आपत्कालीन सेवांना धक्का बसला आहे. नागरिकांपर्यंत आवश्यक माहिती न पोहोचल्यानं अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे फेसबुककडून करण्यात आलेल्या कारवाईचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. अशा प्रकारची कारवाई करून फेसबुकनं आपलं नाव खराब करून घेतल्याची टीका अनेकांनी केली आहे.
आता नो टेन्शन! Facebook आणि Twitter पासून 'असा' वाचवा पर्सनल डेटा; 'या' 6 टिप्स तुम्हाला ठेवतील सेफ
गुरुवारी सकाळी फेसबुकनं ऑस्ट्रेलियातल्या वृत्त संकेतस्थळांच्या बातम्या पोस्ट करण्यापासून रोखल्या. ऑस्ट्रेलियातील नागरिकांना फेसबुकवरून देशी किंवा परदेशी संकेतस्थळ पाहता येत नाहीएत. संसदेत आणण्यात आलेल्या कायद्याच्या विरोधात हे पाऊल उचलण्यात आल्याचं फेसबुकनं सांगितलं. फेसबुक आणि गुगलला न्यूज कंपन्यांना पैसे देण्याशी संबंधित हा कायदा आहे.
सरकारी विभागांच्या अनेक पेजना मोठा फटका
फेसबुकनं घेतलेल्या निर्णयाचा फटका केवळ ऑस्ट्रेलियातील वृत्त संकेतस्थळांना बसलेला नाही. तर अनेक सरकारी विभागांनादेखील याचे परिणाम सहन करावे लागत आहेत. सरकारी विभागांच्या फेसबुक पेजवरून कोणतीही माहिती प्रसिद्ध होत असल्यानं अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील हवामान विभागाचं पेज फेसबुककडून बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे अखेर विभागाकडून लोकांना त्यांच्या संकेतस्थळावर, ऍपवर, ट्विटर पेजवरून येण्याचं आवाहन करावं लागलं.