coronavirus : फेसबुकचे लंडनमधील ऑफिस बंद, एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:51 PM2020-03-07T16:51:23+5:302020-03-07T17:01:09+5:30
coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची 163 प्रकरणे समोर आली आहेत.
लंडन : फेसबुकनेलंडनमधील तीन ऑफिस सोमवारपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनीने आपल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. स्कायन्यूजच्या माहितीनुसार, फेसबुकने एका कर्मचाऱ्याची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्या 3000 कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. फेसबुकचा हा कर्मचारी सिंगापूर येथील होता. 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा कर्मचारी लंडनमधील ऑफिसमध्ये आला होता.
फेसबुकने म्हटले आहे की, ऑफिस सुरु करण्याआधी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. यासंदर्भात फेसबुकने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, "आमच्या सिंगापूर येथील ऑफिमधील एका कर्मचाऱ्याला कोविड-19 (कोरोना व्हायरस) ची लागण झाल्याचे समजते. हा कर्मचारी 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान आमच्या लंडनमधील ऑफिसमध्ये आला होता. दरम्यान, स्वच्छतेसाठी सोमवारपर्यंत लंडनस्थित ऑफिसेस बंद करत आहोत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची घरातून काम करत आहेत."
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची 163 प्रकरणे समोर आली आहेत. फेसबुकने अमेरिकेतील बे एरियामधील आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कारण, गुरुवारी सॅन फ्रॅससिस्कोमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याची दोन प्रकरणे समोर आली होती. तसेच, फेसबुकने आपल्या सिएटल ऑफिस सुद्धा सोमवारपर्यंत बंद केले आहे. येथील एका कॉन्ट्रॅक्टरला कोरोना व्हायरची लागण झाली आहे. याशिवाय, किंग काउंटी येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, फेसबुकने आपल्या कर्मचाऱ्यांकडून 31 मार्चपर्यंत घरातून काम करून घेतले पाहिजे.
दरम्यान, सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 3 हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. भारतातही 30 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.