फेसबुक, व्हॉटस्अॅपवर श्रीलंकेने घातली बंदी; दोन धर्मीयांत तणाव, देशभर सहा तासांची संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:20 AM2019-05-14T05:20:58+5:302019-05-14T05:25:02+5:30
फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली.
कोलंबो : फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली.
श्रीलंकेत सतत हिंसाचार पसरत चालल्यामुळे सोमवारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभर सहा तासांची संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत ही संचारबंदी राहील, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
ईस्टर संडेला झालेल्या हल्ल्यांनंतरची ही सगळ्यात मोठी सामाजिक अशांतता आहे. ईस्टर संडेच्या हल्ल्यांत २६० जण ठार तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. देशाच्या पश्चिम किनाºयावरील गाव चिलावमध्ये जमावाने मशिदीवर व मुस्लिमांच्या मालकीच्या काही दुकानांवर हल्ले केल्यानंतर श्रीलंकेच्या पोलिसांनी दुसºया दिवशी गावात संचारबंदी लागू केली व त्यानंतर समाजमाध्यमांवर बंदी घालण्यात आली. (वृत्तसंस्था)
आणखी हसू नका...
एका मुस्लिम दुकानदाराने फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. फेसबुकवर पोस्ट टाकणाºयाचे नाव अब्दुल हमीद मोहम्मद हासमर (३८) असे असून, त्याने ‘आणखी हसू नका, एकेदिवशी तुम्ही रडाल’ असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते.
मुस्लिम दुकानदाराच्या या टिपणीला स्थानिक ख्रिश्चन्स आणखी हल्ले होणार आहेत, अशी धमकी समजले. अल्पसंख्य मुस्लिम आणि बहुसंख्य सिंहली समाजात हिंसक घटना सुरू होताच मध्यरात्रीपासून फेसबुक आणि व्हॉटस्अॅपवर बंदी घालण्यात आली.
रविवारी सायंकाळी उशिरा कुलियापित्यामध्ये मशीद आणि मुस्लिमांची मालकी असलेल्या काही दुकानांवर हल्ले झाल्यानंतर अशांतता पसरली व अधिकाऱ्यांनी वायव्येकडील शहरात संचारबंदी लागू केली होती. कुलियापित्या आणि चिलावमधील संचारबंदी मागे घेण्यात आल्याचे पोलिसांचे प्रवक्ते रुवान गुणसेकरा यांनी सांगितले.