आता दिवस 25 तासांचा होणार...मला 24 तास पुरतच नाही म्हणणाऱ्यांनो लक्ष द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2018 12:27 PM2018-06-07T12:27:13+5:302018-06-07T12:27:13+5:30
पृथ्वीच्या भोवताली असणारे अंतराळातील ग्रह,तारे किंवा चंद्र यांचा परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होत असतो.
वॉशिंग्टन- काय करु अरे मला 24 तास पुरतच नाहीत... हे हातातलं काम करणं शक्य नाही तेव्हा नवं काम कसं करणार? व्यायामासाठी एक तासही काढणं शक्य नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक दिवस आता 25 तासांचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ वेळ नाही म्हणून आजचं काम उद्यावर ढकलणाऱ्या लोकांना काम पूर्ण करण्यासाठी थोडा अधिक वेळ मिळणार आहे तर आळशी लोकांना आराम करायला एक तास जास्त मिळणार आहे.
सुमारे 1.4 अब्ज वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. पृथ्वीचे परिवलन (म्हणजे पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फिरणे) आणि चंद्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. चंद्र त्यावेळेस पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्यामुळे तेव्हा दिवस केवळ 18 तासांचा असायचा म्हणजे पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती फिरून एक चक्र पूर्ण करायला केवळ 18 तास पुरेसे असायचे. चंद्र जसजसा पृथ्वीपासून दूर जाऊ लागला तसा परिवलनाला वेळ जास्त लागू लागला आणि आज चंद्र ज्या अंतरावर आहे त्यावरुन पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायला 24 तास लागतात. पण संशोधकांनी आता हे लक्षात आणून दिलंय की, चंद्र पृथ्वीपासून अजूनही दूर जातंच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या परिवलनाची गतीही हळूहळू मंदावत जाईल. साहजिकच परिवलानासाठी म्हणजे एका दिवसासाठी लागणारे तासही वाढतील.
यासर्व अंतराळविज्ञानाच्या सांख्यिकीचं म्हणजे अशी आकडेमोड करणारं एक शास्त्र आहे त्याला अॅस्ट्रोक्रोनोलॉजी असं म्हटलं जातं. यामध्ये आपल्या सौरमालेची, पृथ्वीच्या भूगर्भीय इतिहासाची, हवामान बदलाची, अंतराळाची अशा सर्व महत्त्वाच्या बाबींचा विचार व नोंदी ठेवलेल्या असतात.
पृथ्वीच्या भोवताली असणारे अंतराळातील ग्रह,तारे किंवा चंद्र यांचा परिणाम पृथ्वीच्या परिवलनावर होत असतो. याबाबत बोलताना विस्कॉन्सिन मॉडिसन विद्यापीठातील भूगर्भविज्ञानाचे प्राध्यापक स्टीफन मायर्स म्हणाले, जसा चंद्र लांब जातो तशी पृथ्वीची रृपरिवलनाची गती मंदावते. ज्याप्रमाणे स्केटिंग करणारा स्केटर आपली गती कमी करण्यासाठी आपले हात बाहेर काढतो आणि त्याची गती कमी होते. तसेच चंद्र लांब गेल्यामुळे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती कमी होते.
सध्या चंद्र पृथ्वीपासून दरवर्षी 3.2 सेंमी इतक्या गतीने लांब जात आहे.