इसिसनं उडवली मोसुलमधील प्रसिद्ध नूरी मस्जिद
By admin | Published: June 22, 2017 09:42 AM2017-06-22T09:42:07+5:302017-06-22T09:44:17+5:30
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (ISIS) मोसुलमधील प्रसिद्ध अल-नूरी मस्जिद बुधवारी स्फोट घडवून उडवली.
Next
ऑनलाइन लोकमत
बगदाद, दि. 22 - दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (ISIS) मोसुलमधील प्रसिद्ध अल-नूरी मस्जिद बुधवारी स्फोट घडवून उडवली. ISIS नेता अबू बकर अल बगदादी 2014 मध्ये या मस्जिदच्या माध्यमातून पहिल्यांदा लोकांसमोर आला होता व त्यानं आपल्या खिलाफतची घोषणा केली होती. दरम्यान, मस्जिद उडवल्याची माहिती इराकी सैन्यानं दिली.
दरम्यान, इसिसनं असा दावा केला आहे की, ही मस्जिद अमेरिकेच्या एका लढाऊ विमानाच्या हल्ल्यात नष्ट झाली. तर दुसरीकडे अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावला आहे.
काय आहे अल-नूरी मस्जिदचे वैशिष्ट्य ?
- इसिस आणि त्याविरोधात लढणारे पक्ष यासाठी मस्जिदचे विशेष असे महत्त्व आहे
- इसिस नेता अबू बकल अल बगदादीनं जुलै 2014 मध्ये येथे एक सभा घेऊन नवीन इस्लामिक राज्य स्थापित करण्याची घोषणा केली होती
- या घोषणेच्या आठ आठवड्यांनंतर मोसुल शहरावर इसिसनं कब्जा केला होता
- 1172 मध्ये मोसुल आणि अलेपोवर शासन करणारा नूर अल दीन महमूद जांगीनं ही मस्जिद निर्माण करण्यासाठी आदेश दिला होता.
- नूर अल दीन महमूद जांगीच्या नावावरुनच मस्जिदचे नाव ठेवण्यात आले होते
"इसिसनं पराभव स्वीकारला आहे"
इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी सांगितले की, मस्जिद उडवणे म्हणजे इसिसनं पराभव स्वीकारल्याची अधिकृत घोषणा आहे. तर इराकी सैन्यानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकारत असे नमूद करण्यात आले आहे की, मस्जिद पूर्णतः उद्धवस्त झाली आहे. इसिसनं या पूर्वी इराक आणि सीरियामधील अनेक महत्त्वपूर्ण स्थळं उद्धवस्त केली आहेत.
अमेरिकी सैन्याच्या नेतृत्वात मोसुलमध्ये इसिसविरोधात चार दिवसांपासून लढाई सुरू आहे. चौथ्या दिवशी मोसुलमधील दोन प्रसिद्ध मस्जिद उद्धवस्त करण्यात आल्या. तीन वर्षापूर्वी बगदादीनं आपल्या खिलाफतची घोषणा केली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत जिहादी संघटनांनी इराक आणि सीरियामध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळं आणि स्मारकं उद्धवस्त केली आहेत.
इसिसनं नूरी मस्जिदसोबत अल हब्दा नावाची आणखी एक इमारतही उडवली. ही इमारत नूरी मस्जिदच्या समोर होती. मोसुलमधील ही सर्वात लोकप्रिय इमारत होती. इसिसनं यापूर्वीही ही इमारत उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.