Farmers Protest : आंदोलनाला समर्थन देणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांकडून आता सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 08:46 PM2021-02-12T20:46:40+5:302021-02-12T20:49:32+5:30
Farmers Protest: डिसेंबर महिन्यात जस्टिन ट्रुडो यांनी केलं होतं शेतकरी आंदोलनाचं समर्थन
गेल्या अनेक दिवसांपासून देशात नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या आंदोलनाला परदेशातील काही बड्या व्यक्तींनी समर्थन दिलं होतं. तसंच कॅनडाचेपंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीदेखील या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. परंतु आता कॅनडानं आपलं मत बदललं असून केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. शेतकरी आंदोलनाबाबती केंद्र सरकारनं चर्चेतून तोडगा काढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं ट्रुडो यांनी कौतुक केलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली. तसंच कॅनडात असलेल्या भारतीय डिप्लोमॅट्स आणि परिसराची सुरक्षा अधिक चांगली ठेवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिल्याचं श्रीवास्तव म्हणाले.
यापूर्वी बुधवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारत सरकारला कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरवण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील भारताकडून आवश्यक ती सर्वोतपरी मदत केली जाणार असल्याचं म्हटलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून देशात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरूवातील कॅनडाच्या पंतप्रधानांनी या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंध थोडे ताणले गेले होते. भारतानं यावर आक्षेप घेत कॅनडाच्या डिप्लोमॅट्सशी याबद्दल चर्चा केली होती. "कॅनडाच्या हाय कमिशनला समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आंदोलनाबद्दलची आंदोलनाबद्दलची टिपण्णी स्वीकार केली जाणार नाही. हे भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये दखल दिल्याप्रमाणे आहे," असं भारतानं स्पष्ट केलं होतं.
On farmer protest, PM Trudeau commended efforts of the govt of India to choose the path of dialogue as befitting a democracy. He also acknowledged the responsibility of his govt in providing protection to Indian diplomatic personnel & premises in Canada: MEA Spokesperson pic.twitter.com/4hjmfNBSyh
— ANI (@ANI) February 12, 2021
याव्यतिरिक्त भारतानं कॅनडाला इशारा देत दोन्ही देशांमधील संबंध यामुळे बिघडू शकतात असं म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून मात्र कॅनडाच्या मतामध्ये बदल झाल्याचं दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मागणीनंतर भारतानंही कॅनडाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा पूर्वपदावर येतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.