Farmers Protest : रिहानाचं कौतुक करणारं ट्वीट थेट ट्विटरचे CEO ही 'लाईक' करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 06:52 PM2021-02-05T18:52:50+5:302021-02-05T18:59:54+5:30

यापूर्वी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रिहाना, ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेकांनी केलं होतं ट्वीट

Farmers Protest When the CEO of Twitter likes a tweet praising pop singer Rihanna | Farmers Protest : रिहानाचं कौतुक करणारं ट्वीट थेट ट्विटरचे CEO ही 'लाईक' करतात तेव्हा...

Farmers Protest : रिहानाचं कौतुक करणारं ट्वीट थेट ट्विटरचे CEO ही 'लाईक' करतात तेव्हा...

Next
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला रिहानानं दिलं होतं समर्थनरिहानाचं कौतुक करणारं ट्वीट ट्विटरच्या सीईओंनीच केलं लाईक

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघाला नाही. अशा परिस्थितीत २६ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळणही लागलं होतं. दरम्यान, या शेतकरी आंदोलनानं विदेशातील लोकांचं लक्षही आकर्षित करून घेतलं आहे. दोन दिवसांपूर्वी पॉप स्टार रिहानंनं आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केलं होतं. त्यानंतर जगातिल अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, या एकंदरीत वातावरणात आता ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रिहानाचं कौतुक करणारी काही ट्वीट्स लाईक केली आहेत.

अमेरिकेतील वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार कॅरन यांनी नुकतंच रिहानाचं कौतुक करत काही ट्वीट्स केले होते. भारतात कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रिहानानं आवाज उठवला आहे असं म्हणत कॅरन यांनी रिहानाचं कौतुक केलं होतं. रिहानानं सूडान, नायजेरिया आणि आता भारतातील अशा अनेक आंदोलनांवर आपलं मत व्यक्त केलं आहे, असंही कॅरन यांनी एका ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. 
 


रिहानाचं कौतुक करण्यात आलेल्या काही ट्वीट्सना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांनीदेखील लाईक केलं आहे. यापूर्वी वॉशिंग्टन पोस्टच्या याच पत्रकारानं ट्विटरनं भारतात शेतकरी आंदोलनावर एक विशेष इमोजी तयार करण्याचं आवाहनही केलं होतं. अमेरिकेत ब्लॅक लाईफ मॅटर्सच्या वेळी असं करण्यात आलं होतं. जॅक डॉर्सी यांनी हे ट्वीटदेखील लाईक केलं आहे. रिहाना व्यतिरिक्त ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या नातेवाईक मीना हॅरिस यांनीदेखील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं होतं. त्यानंतर यावरून भारतात काहींनी याचा विरोध तर काहींनी याचं समर्थन केलं होतं. 


याव्यतिरिक्त भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं शेतकरी आंदोलन देशांतर्गत मुद्दा असून त्यावरील बाहेरील टिपण्णीवर आक्षेप नोंदवला होता. याव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्रालयानं भारत विरोधी दुष्प्रचार सुरू असल्याचं सांगत याला विरोधा आवश्यक असल्याचं म्हटलं. तसंच कोणीही कोणत्या माहितीशिवाय यावर वक्तव्य करू नये असंही सांगण्यात आलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाच्या या वक्तव्यानंतर अनेक भारतातील अनेक सेलिब्रिटींनी भारताच्या समर्थनार्थ ट्वीट केली होती. क्रिकेटमधील काही मंडळी असतील किंवा बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटी अनेकांनी भारताविरोधातील तथाकथित परदेशी दुष्प्रचाराला विरोध केला होता.  

Web Title: Farmers Protest When the CEO of Twitter likes a tweet praising pop singer Rihanna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.