नशिबाची खैरात! लॉटरीची लागोपाठ दोन बंपर बक्षिसे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2017 12:26 AM2017-07-13T00:26:55+5:302017-07-13T00:26:55+5:30
लॉटरीमध्ये बंपर बक्षिस जिंकण्याची शक्यता दीड कोटींमागे एक एवढी दुर्मिळ असे संख्याशास्त्र मानते
कॅलिफोर्निया: लॉटरीमध्ये बंपर बक्षिस जिंकण्याची शक्यता दीड कोटींमागे एक एवढी दुर्मिळ असे संख्याशास्त्र मानते. पण कॅलिपोर्नियातील रोझा डॉमिंग्युएज या १९ वर्षाच्या तरुणीचे नशीब एवढे बलवत्तर की कॅलिफोर्निया सरकारी लॉटरीच्या लागोपाठच्या दोन सोडतींची बंपर बक्षिसे तिला लागली आहेत. गेल्या आठवड्यात अॅरिझोनाहून घरी परतत असताना ‘आजचा दिवस लकी आहे’, असा विचार तिच्या मनात आला आणि पासो रोबल्स येथे पेट्रोल पंपावर थांबली असता तिने ‘पॉवर ५’ या लॉटरीच्या तिकिटाचे पाच डॉलरचे स्क्रॅचकार्ड खरेदी केले. लॉटरीच्या निकालाच्या दिवशी तिने ते कार्ड स्क्रॅच केले आणि तिकिटाच्या त्या क्रमांकाला ५,५५,५५५ डॉलरचे चक्क बंपर बक्षिस लागलेले होते!
हा आनंद ओसरलेला नसतानाच काही दिवसांनी पुन्हा प्रवास करताना तिने पुन्हा एकदा नशीब आजमावून पाहायचे ठरविले. यावेळी तिने मॉन्टेरी कौंटीमधील पेट्रोल पंपावर ‘लकी फॉर्च्युन’ या लॉटरीचे तिकिट काढले आणि या तिकिटालाही एक लाख डॉलरचे पहिले बक्षिस लागले. अशा प्रकारे रोझाला एकाच आठवड्यात दोन लॉटरींमध्ये मिळून बक्षिसापोटी ६,५५,५५५ डॉलर मिळाले! नशिबाच्या या खैरातीने रोझा एवढी आनंदित झाली की तिला अश्रुंना आवर घालणे कठीण झाले! आनंदाच्या या धक्क्यातून ती सावरली नसून बक्षिसाच्या एवढ्या पैशाचे करायचे काय, हे तिने अद्याप ठरविलेले नाही. पण भरपूर शॉपिंग करायचे व एखादी फक्कडशी नवी मोटार घ्यायची, असा तिचा विचार आहे.