इराणवर निर्बंधांचे भवितव्य भारत, चीनच्या भूमिकेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 04:42 AM2018-10-30T04:42:12+5:302018-10-30T06:44:42+5:30
आयात थांबविणे अशक्य; अमेरिकेतही मतभेद
वॉशिंग्टन : अमेरिकेने इराणविरुद्ध लावलेल्या निर्बंधांमुळे इराणकडून तेल खरेदी करण्यावर येणाऱ्या बंदीला चीन, भारत व तुर्कस्तानकडून विरोध होत आहे. या देशांच्या भूमिकेवरच इराणविरोधी निर्बंधांचा आता खरा कस लागणार आहे.
अमेरिकेने इराणविरुद्ध नव्याने लावलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी ५ नोव्हेंबरपासून होत आहेत. इराणकडून तेल खरेदी थांबवून शून्यावर आणण्यासाठी तेल खरेदीदार देशांवर अमेरिका दबाव टाकत आहे, परंतु इराणच्या सर्वोच्च पाच ग्राहकांनी अमेरिकेच्या या भूमिकेला विरोध केला आहे. भारत, चीन व तुर्कस्तानचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. जगात पर्यायी तेल पुरवठादार नसल्यामुळे इराणचे तेल घेणे थांबविता येणार नाही, अशी भूमिका या देशांनी घेतली असल्याचे समजते. परंतु बंदीच्या मुद्द्यावर खुद्द ट्रम्प प्रशासनातच दोन मतप्रवाह आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बॉल्टन यांच्या नेतृत्वाखालील गटाला वाटते की, या प्रकरणी कठोरात कठोर भूमिका घेऊन इराणी तेलाची विक्री शून्यावर आणायलाच हवी.
हा मार्ग अतिरेकीच
याउलट विदेश मंत्रालयातील अधिकाºयांना मात्र हा मार्ग अतिरेकी वाटतो. इराणी तेलाची विक्री पूर्ण बंद केल्यास तेल टंचाई निर्माण होऊन किमती वाढतील. त्याचा फटका अंतिमत: अमेरिका व मित्र राष्ट्रांनाही बसेल. त्यामुळे इराणकडून काही प्रमाणात तेल खरेदीस परवानगी द्यावी, असे या अधिकाऱ्यांना वाटते.