गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या वडिलांची किडनी मुलाला देता येणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 04:56 PM2017-10-30T16:56:54+5:302017-10-30T17:34:59+5:30
प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्याने मुलाचा जीव धोक्यात. डॉक्टरांच्या निर्णयाने पालक चिंताग्रस्त.
अॅटलांटा- वडिलांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याने ते आपल्या मुलाला किडनी देऊ शकत नसल्याचा एक निकाल अॅटलंटामध्ये देण्यात आला. जन्मापासूनच एका चिमुकल्याला किडनीचा त्रास होता. त्यामुळे त्याची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी त्या चिमुकल्याच्या वडिलांनी आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला. पण वडिलांची पार्श्वभूमी गुन्हेगाराची असल्याकारणाने ही शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
ए.जे.डिकरसन असं या चिमुकल्याचं नाव असून तो आता दोन वर्षांचा आहे. त्याच्या जन्म झाला तेव्हापासूनच त्याला किडनी नव्हती, असं अॅटलंटामधील डॉक्टरांनी सांगितलं. चिमुकल्याची आई कॅरमेलिओ बर्गस याविषयी बोलताना म्हणाली की,‘हा दोन वर्षीय मुलगा त्याच्या जन्मापासून तो जगण्यासाठी संघर्ष करतोय. त्याला नेहमी होणाऱ्या यातना आम्हाला पाहवत नव्हत्या. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यासाठी त्याच्या वडीलांनी स्वत:ची किडनी देण्याचीही तयारी दाखवली. त्यांची किडनी माझ्या मुलाला १०० टक्के सुट होत असल्याने वापरता येणार होती, मात्र तरीही असा निर्णय घेण्यात आल्याने आम्ही फार दु:खी झालो आहोत.’
३ ऑक्टोबर रोजी ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी सर्व तयारीही करण्यात आली होती. मात्र नंतर डॉक्टरांना समजलं की, ज्यांच्याकडून किडनी घेण्यात येणार आहे त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड सापडला आहे. म्हणजेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने ते हे प्रत्यारोपण करू शकणार नाहीत. शस्त्रक्रियेच्या शेवटच्या मिनिटाला ही शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी डिकरसन यांना अवैध शस्त्र हाताळल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आपल्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे.डिकरसन म्हणतात की, ‘माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला का देण्यात येत आहे. आधीच तो आजारी आहे आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी आधीच खूप उशीर झाला असल्याचं डॉक्टरांनीच सांगितलंय. त्यात ही शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याने त्याच्या जीवाला धोका वाढला आहे.
किडनी प्रत्यारोपणासाठी वडिलांची किडनी १०० टक्के मॅच होत असल्याने संपूर्ण कायदेशीर नियमांची अंमलबजावणी करून पून्हा जानेवारी २०१८ मध्ये प्रत्यारोपण करण्यात येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
सौजन्य - www.mirror.co.uk