फवाद खान बरळला, 'बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही'
By admin | Published: October 1, 2016 11:14 AM2016-10-01T11:14:16+5:302016-10-01T15:13:02+5:30
इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनकडून (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात अभिनेता फवाद खानने प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - चित्रपट निर्मात्यांची संघटना इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनकडून (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात अभिनेता फवाद खानने प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. स्पॉटबॉय या वेब पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार फवाद खानने बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही असं बोलला असल्याचं कळलं आहे.
इम्पाचे अध्यक्ष आणि निर्माता अग्रवाल यांनी फवाद खानने प्रसारमाध्यमांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 'बॉलिवूड कोणाच्या बापाचं नाही अशी प्रतिक्रिया फवाद खानने प्रसारमाध्यमांमध्ये काहीजणांना दिल्याचं मला आपल्याच क्षेत्रातील एका व्यक्तीकडून कळलं आहे', असं अग्रवाल यांनी सांगितलं आहे. फवाद खानच्या या वक्तव्यावर अग्रवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेत 200हून अधिक निर्माता सहभागी झाले होते, सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला माझ्या चित्रपटातून पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना वगळावं लागत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं आहे.
मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनीदेखील फवादच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'मलादेखील फवाद खानने वादग्रस्त वक्तव्य केल्याचं कळलं आहे. भारतीय लोकांचं मन उदार नाही असं फवाद बोलल्याची माहिती मला मिळाली आहे. पाकिस्तानी कलाकार भारतात वेगळं बोलतात आणि आपल्या देशात जाऊन राग व्यक्त करतात, असं अमेय खोपकर बोलले आहेत.
भारत-पाकिस्तानचे सध्याचे संबंध लक्षात घेता इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन अर्थात इम्पाने वार्षिक सर्वसाधारण सभेत कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला होता.
मनसेने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून निघून जाण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून काढता पाय घेतला होता. आता इम्पानेही घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे शाहरुखच्या 'रईस' आणि करण जौहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमांचं भवितव्य धोक्यात आलं आहे. या दोन्ही सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका आहेत.