भीतीग्रस्त पॅरीसवासीयांची फटाक्यांच्या आवाजांनी केली पळताभुई
By Admin | Published: November 16, 2015 01:40 PM2015-11-16T13:40:46+5:302015-11-16T13:41:19+5:30
दहशतवादी हल्ल्यामध्ये १३२ पॅरीसवासियांनी प्राण गमावल्यानंतर नागरीकांमध्ये भीतीचा पगडा इतका तीव्र आहे की, फटाक्याच्या आवाजालाही गोळीबार समजून काही वेळ नागरीकांची पळताभुई थोडी झाली
>ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. १६ - दहशतवादी हल्ल्यामध्ये १३२ पॅरीसवासियांनी प्राण गमावल्यानंतर नागरीकांमध्ये भीतीचा पगडा इतका तीव्र आहे की, फटाक्याच्या आवाजालाही गोळीबार समजून काही वेळ नागरीकांची पळताभुई थोडी झाली. दे ला रिपब्लिक या ठिकाणी जमलेले शेकडो नागरीक फटाक्याच्या आवाजानंतर सैरावैरा पळायला लागले, काहीजण हॉटेलच्या आस-याला धावले तर काहीजणांनी स्वयंपाकघरात आसरा शोधला.
एका तरूण मुलाने स्फोटासारखा आवाज ऐकला आणि तो जोरात धावायला लागला. त्याच्या जवळच दे ला रिपब्लिकमध्ये हीटर किंवा दिवा फुटला आणि त्याचा मोठ्ठा आवाज झाला आणि गोंधळात भर पडली, आणि नागरीक अजून अस्थिर झाले. परीसरातल्या लोकांनी सोशल मीडियावर नव्या स्फोटांची माहिती दिली आणि गोंधळ आणखी वाढला.
त्यामुळे शुक्रवारी लक्ष्य करण्यात आलेल्या ले कॅरीलॉन या हॉटेलच्या परीसरातही पुन्हा एकच गोंधळ उडाला आणि नागरीक भीतीने पळायला लागले. काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार तर अनेक लोकांनी काही अंतरावरच असलेल्या अत्यंत थंड पाण्याच्या कालव्यामध्ये जीवाच्या काल्पनिक भीतीने उड्या मारल्या.
महापौरानाही या अफवेचा मेसेज आला आणि त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
रानटी दहशतवादी हल्ला झालेल्या परीसरात लोकांना एकत्र आलेलं बघून पोलीसांना बरं वाटलं होतं, परंतु लवकरच या अफवांमुळे सैरावैरा पळत असलेले नागरीक त्यांना बघावे लागले.
जो काही आवाज झाला तो फटाक्यांचा होता, आणि लोकांना घाबरण्याची काहीच गरज नव्हती असं मत त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलीसांनी व्यक्त केलं. गोळीबाराच्या घटनेची अफवा पसरल्यामुळे पोलीसांनी आपापली शस्त्रास्त्रे काढून त्या दिशेने धाव घेतलीआणि गोंधळात आणखी भर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. थोडक्या अवधीतच या सगळ्याचा उलगडा झाला असला तरी दहशतवादी हल्ल्यानंतर या निमित्ताने पॅरीसवासीयांनी या हल्ल्याचा किती धसका घेतलाय हे दिसून आलं.