चीनमधील नव्या ‘हंता’च्या भीतीने सारे जग धास्तावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:07 AM2020-03-26T02:07:16+5:302020-03-26T06:30:57+5:30
बिजिंग : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस किंवा औषध शोधण्यात जगातील एकाही देशाला अजून यश आलेले नसतानाच चीनमध्ये ‘हंता’ या ...
बिजिंग : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक लस किंवा औषध शोधण्यात जगातील एकाही देशाला अजून यश आलेले नसतानाच चीनमध्ये ‘हंता’ या नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. त्यामुळे एकाचा बळी गेला असून, या घटनेने जगातील अनेक देश पुन्हा धास्तावले आहेत.
हंता विषाणूची बाधा झालेला माणूस शांडोंग प्रांतामध्ये काही कामासाठी बसने चालला होता. प्रवासातच त्याचे निधन झाले. हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या ३२ जणांची रक्त तपासणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल काही दिवसांत आरोग्य अधिकाऱ्यांच्या हाती येणार आहे.
असे आहे हंता विषाणूचे स्वरूप
सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेंशन या संस्थेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार उंदीर किंवा मूषकवर्गीय प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या माणसाला हंता विषाणूचा संसर्ग होतो. आपल्या घराच्या आसपास उंदीर खूप झाले असले, तर या विषाणूची बाधा होण्याचा मोठा धोका आहे. धडधाकट लोकांनाही या विषाणूची लागण होऊ शकते. हंता या विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसºया व्यक्तीला संसर्ग होत नाही. उंदीर किंवा मुषकवर्गीय प्राण्यांची विष्ठा, मुत्र यांना स्पर्श झाल्यानंतर तेच हात एखाद्या माणसाने आपल्या नाक, डोळे, तोंड यांना लावले तर हंताचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. हंता व कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे सारखीच असतात. त्यामध्ये डोके दुखणे, पोटात दुखणे, आदी लक्षणे आहेत.