पाकिस्तानवर आपत्ती, विघटन हाेण्याची भीती; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 12:49 PM2023-05-19T12:49:14+5:302023-05-19T12:50:22+5:30
पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या माझ्या पक्षाविरुद्ध लष्कराने कारवाई करावी यासाठी सत्ताधारी आघाडीने कट रचला आहे, असा आरोप त्यांनी केला.
लाहोर : पाकिस्तानवर लवकरच मोठी आपत्ती कोसळणार असून त्यामुळे या देशाचे विघटनही होऊ शकते, असा इशारा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या माझ्या पक्षाविरुद्ध लष्कराने कारवाई करावी यासाठी सत्ताधारी आघाडीने कट रचला आहे, असा आरोप त्यांनी केला.
इम्रान खान हे सध्या लाहोरमधील झमान पार्क येथील त्यांच्या निवासस्थानी आहेत. तेथून त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, निवडणुका घेणे हाच पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता संपविण्याचा एकमेव मार्ग आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे नेते व नवाज शरीफ यांनी लंडनला पलायन केले. पाकिस्तानातील राज्यघटनेचे तसेच सरकारी यंत्रणांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. पाकिस्तानवर कोसळणार असलेली मोठी आपत्ती टाळण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पाकिस्तान वाचविणे शक्य होईल.
इम्रान खान यांच्या निवासस्थानी ३० ते ४० दहशतवादी लपून बसले असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या दहशतवाद्यांनी २४ तासांच्या आत पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, अशी मुदत त्यांना पाकिस्तान सरकारने बुधवारी दिली होती. ती मुदत गुरुवारी संपली. आता या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दले कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांच्या घराला सुरक्षा दलाच्या सैनिकांनी वेढा दिला असून, तिथे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांवर कडक कारवाई
इम्रान खान यांना ९ मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या इमारतीतून अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील मुख्यालयावर तसेच लाहोर येथील कॉर्प्स कमांडरच्या घरावर हल्ले चढविले. त्या देशाच्या विविध प्रांतांमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या. हा हिंसाचार दहशतवाद्यांनी केला असल्याचा पाकिस्तान सरकार, लष्कराचा दावा आहे. या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.