जपानमध्ये पुन्हा त्सुनामीची भीती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 02:36 AM2019-03-03T02:36:56+5:302019-03-03T02:37:04+5:30
जपानमध्ये ११ मार्च, २०११ साली आलेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती, हे सर्वांनीच पाहिलं होतं.
जपानमध्ये ११ मार्च, २०११ साली आलेल्या भूकंप आणि त्सुनामीमुळे काय स्थिती झाली होती, हे सर्वांनीच पाहिलं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल २० हजार जपानी नागरिकांना जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा एकदा भूकंप आणि त्सुनामीची चर्चा जपानमध्ये होऊ लागली आहे. त्यामुळे तेथील लोक घाबरून गेले आहेत. अशी भीती वाटण्याचं कारण म्हणजे तेथील समुद्रात आढळून आलेले दुर्मीळ मासे.
काही दिवसांपूर्वी जपानच्या ओकिनावा द्वीपाजवळ मच्छीमारांना समुद्रात १३ फूट लांब दोन ओरफिश दिसले होते. जपानमध्ये मानलं जातं की, हा मासा दिसल्यावर तिथे भूकंप आणि त्सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती येते. नंतर या माशांना मच्छीमारांनी पकडलं. मच्छीमारांचं म्हणणं आहे की, हे मासे फार रहस्यमयी आहेत.
तज्ज्ञांच्या मते सामान्यत: ओरफिश समुद्रात १ हजार ते ३ हजार फूट खोलीवर असतात. जेव्हा समुद्रात काही हालचाल होते, तेव्हाच हे मासे समुद्र सपाटीवर येतात. या माशांकडे भूकंपाच्या संकेतासारखं पाहिलं जातं. तेथील प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांत जपानमध्ये मच्छीमारांना एकूण सात असे मासे सापडले आहेत. या आधी ओरफिश नावाचे हे मासे जपानमध्ये समुद्र तटावर २०११ मध्ये दिसले होते. त्यानंतर जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामी आली होती. आताही ते दिसल्यामुळे जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीची चर्चा होऊ लागली असून, नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. मात्र, जपानमध्ये भूकंप येण्याची शक्यता नाही, असं तज्ज्ञांनी म्हटले आहे. हे मासे दिसले म्हणजे भूकंप वा त्सुनामी येणार, असं गृहित धरता येत नाही. दोन्हींचा एकमेकांशी संबंध असल्याचं अजिबात सिद्ध झालेलं नाही. कदाचित, काही पर्यावरणातील बदलांमुळे हे मासे वर आले असतील.