नव्या घातक विषाणूने जगभरात घबराट; विदेशी प्रवाशांची कसून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 06:25 AM2021-11-27T06:25:26+5:302021-11-27T06:27:45+5:30
१४ देशांत कोरोना साथ मोठ्या प्रमाणात आहे, तिथे मर्यादित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली जाईल.
नवी दिल्ली : कोरोनाचा डेल्टापेक्षा भयंकर नवा विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने भारत सतर्क झाला आहे. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, हाँगकाँगमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या तपासणीचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. हा विषाणू इस्राएल व बेल्जियममध्येही आढळला आहे. ब्रिटनने आफ्रिकेच्या दक्षिणेकडील सहा देशांतील प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.
बी.१.१.५२९ हा नवा कोरोना विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळला असून, तो जगात डेल्टा विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याची बाधा झालेले रुग्ण कमी आहेत. मात्र, त्यामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. उपचार न मिळालेल्या एड्सग्रस्त रुग्णाच्या शरीरातून हा जन्माला आला असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
कोरोनामुळे स्थगित आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ज्या १४ देशांत कोरोना साथ मोठ्या प्रमाणात आहे, तिथे मर्यादित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली जाईल. प्रवाशांवर लक्ष ठेवा
- केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे की, नव्या विषाणूमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने केंद्र सरकारने व्हिसाबाबतचे निर्बंध शिथिल केले असून, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात येण्याची अनुमती दिली आहे.
- मात्र या विषाणूमुळे विदेशातून भारतात येणाऱ्यांची राज्याच्या यंत्रणांद्वारे बारकाईने वैद्यकीय तपासणी अत्यावश्यक आहे. हे
विदेशी प्रवासी भारतात भ्रमंती करताना कोणाच्या संपर्कात येतात, यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे.