२०२५मध्ये अमेरिका, चीनच्या युद्धाची भीती, अमेरिकी हवाई दलाच्या जनरलचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 07:20 AM2023-01-30T07:20:12+5:302023-01-30T07:20:50+5:30
China-US War: २०२५ साली अमेरिका व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.
वॉशिंग्टन : २०२५ साली अमेरिका व चीनमध्येयुद्ध होण्याची शक्यता अमेरिकी हवाई दलाचे जनरल माईक मिनिहन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवाई दलातील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हा उल्लेख केला आहे.
अमेरिका- चीनच्या संभाव्य युद्धासंदर्भात मिनिहन यांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची खासगी मते आहेत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने व्यक्त केली. तैवानचा कब्जा घेण्यासाठी चीनने सुरू केलेल्या आक्रमक हालचालींमुळे अमेरिका अस्वस्थ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मिनिहन यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोन वर्षांनंतर अमेरिका- चीन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, हे भाकीत खोटे ठरावे, अशी माझी इच्छा आहे.
संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी याआधी सांगितले होते की, तैवानवर चीनने आक्रमण केल्यास अमेरिका लष्करी हस्तक्षेप करेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सरकारने दिला होता. (वृत्तसंस्था)
अमेरिका-भारत संबंध पुरेसे बळकट नाहीत
अमेरिका व भारताचे संबंध अद्यापही पुरेसे बळकट नाहीत. दोन्ही देशांतील आर्थिक संबंध आणखी दृढ होण्याची गरज असून त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. भारत-अमेरिकेतील जनतेमध्ये सहकार्य वाढीस लागल्यास त्याचा या देशांना फायदा होईल.
- श्रीनिवास ठाणेदार, अमेरिकी काँग्रेसचे सदस्य
क्षेपणास्त्रांच्या माऱ्याच्या टप्प्यात चीनची शहरे
चीनमधील बहुतांश शहरे आता भारतीय क्षेपणास्त्रांच्या माऱ्याच्या टप्प्यात आली आहेत, असे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट (एफएएस) या संघटनेच्या एका अहवालात म्हटले आहे. भारताने आता पाकिस्तान नव्हे तर चीनला डोळ्यासमोर ठेवून आपल्या अणुधोरणात मोठे बदल केले आहेत. भारताकडे सध्या १६० अण्वस्त्रे आहेत. नव्या क्षेपणास्त्रांसाठी आणखी अण्वस्त्रे बनविण्याची त्या देशाला गरज भासू शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.