‘फेडरल रिझर्व्ह’चे व्याजदर ‘जैसे थे’
By admin | Published: April 29, 2016 05:36 AM2016-04-29T05:36:12+5:302016-04-29T05:36:12+5:30
फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने आपल्या धोरणात्मक व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही;
वॉशिंग्टन : फेडरल रिझर्व्ह या अमेरिकेच्या केंद्रीय बँकेने आपल्या धोरणात्मक व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही; पण हे दर जूनमध्ये वाढविण्याचा आपला पर्याय खुला ठेवला आहे.
फेडरल रिझर्व्हच्या संचालक मंडळाची दोनदिवसीय बैठक येथे बुधवारी समाप्त झाली. त्यानंतर बुधवारी बँकेने आपला निर्णय जाहीर केला. अमेरिकी अर्थव्यवस्थेत मंदी असूनही आपण पतधोरण कठोर करू शकतो, असे संकेत बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात देण्यात आले आहेत.
यापूर्वी बँकेच्या संचालक मंडळाची मार्चअखेरीस बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात सुधारणा झाल्याचे संकेत मिळाले होते; पण आर्थिक विकासाचा वेग अजूनही मंद आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.बँकेने म्हटले आहे की, महागाईवर त्याचप्रमाणे जागतिक आर्थिक घडामोडींवर बँकेची बारीक नजर आहे.
जगभर असलेल्या आर्थिक अडचणींचाही विचार केला जात आहे. त्यामुळेच व्याजदरात तूर्त बदल न करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयानंतर अमेरिकी शेअर बाजारात तेजी आली आणि डॉलरच्या मूल्यात किरकोळ बदल झाला.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फेडरल बँकेने १० वर्षांत प्रथमच व्याजदर वाढविले होते. त्याचवेळी यापुढेही व्याजदर वाढीचे संकेत दिले होते. मात्र, यावेळी व्याजदरात वाढ केली नाही. जूनमध्ये मात्र व्याजदर ०.२५ टक्क्यावरून ०.५० टक्काकेले जाण्याची शक्यता आहे. काही विश्लेषकांच्या मते सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढीची शक्यता आहे.