भारतीयांवर गोळीबार होताना मदतीला धावणा-या 'त्या' तरुणाचा सत्कार
By admin | Published: March 20, 2017 02:01 PM2017-03-20T14:01:09+5:302017-03-20T14:01:09+5:30
अमेरिकेत झालेल्या गोळीबारात आपल्या जीवाची बाजी लावत भारतीयाचा जीव वाचवणा-या इयान ग्रिलटचा सन्मान करण्यात येणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
कान्सास, दि. 20 - अमेरिकेत झालेल्या गोळीबारात आपल्या जीवाची बाजी लावत भारतीयाचा जीव वाचवणा-या इयान ग्रिलटचा सन्मान करण्यात येणार आहे. अमेरिकेतील भारतीयांनी इयान ग्रिलटचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेतील कान्सास शहरातील बारमध्ये एका छोट्याशा भांडणातून संतप्त अमेरिकी नागरिकाने दोन भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोतला और आलोक मदासनीवर गोळीबार केला होता. या गोळीबारात श्रीनिवास कुचिभोतला यांचं निधन झालं. हल्लेखोराने केलेल्या या गोळीबारात कदातिच आलोक मदासनी यांचाही मृत्यू झाला होता. पण घटनास्थळी उपस्थित अमेरिकी नागरिक इयान ग्रिलट याने आपल्या जीवाची पर्वा न करता अलोक मदासनी यांची मदत केली आणि त्यांचा जीव वाचवला. अलोक मदासनी यांना वाचवताना इयान ग्रिलट मात्र जखमी झाले.
इयान जेव्हा श्रीनिवास आणि आलोक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा हल्लेखोराने झाडलेली गोळी त्याच्या खांद्याला लागून गेली. या घटनेत आलोकही जखमी झाले होते. इयानने माणुसकीचं दर्शन दाखवत मदतीला धावल्याबद्दल अमेरिकेतील भारतीय नागरिक इयानला 'अ ट्रू अमेरिकन हीरो' असा खिताब देणार आहे. 25 मार्च रोजी ह्यूस्टन येथील इंडियामधील 14व्या वार्षिक उत्सव कार्यक्रमात इयानचा सन्मान करण्यात येणार आहे. हा वार्षिक उत्सव कार्यक्रम इंडिया हाऊसचा निधी उभारण्याचा मुख्य कार्यक्रम असतो.
'वर्षातील आमच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात इयानचा सत्कार करणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही ह्यूस्टनमध्ये राहणा-या सर्व लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो. यावेळी सर्वांनी उपस्थित राहून इयानचं कौतुक करावं', असं बोर्डाचे सदस्य आणि इंडिया हाऊस 2017 च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जितेन अग्रवाल यांनी सांगितलं आहे.
अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून वांशिक हिंसेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेक भारतीयांना अशा घटनांना सामोरं जावं लागत आहे. गेल्याच महिन्यात एका तरुणीला न्यूयॉर्क सबवे येथे वांशिक हिंसाचाराला सामोरं जावं लागलं होतं. अशा घटनांमुळे अमेरिकेतील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं असून अमेरिकी नागरिकांना भारतीय संस्कृती आणि इतिहासाची माहिती देत जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोट यांची हत्या करण्यात आल्यानंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पत्नी सुनैना दुमाला अमेरिकेत जाणार आहेत. फेसबुकवर तिने एक पोस्ट करत याची माहिती दिली. श्रीनिवासन यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही तिने केले . फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये सुनैनाने अमेरिकेत राहत असणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ती म्हणाली, 'अमेरीकामध्ये वर्णद्वेषामुळे होणाऱ्या सतत हल्ल्यामुळे मी श्रीनिवास यांना अमेरिकामध्ये जाण्यास नकार दिला होता. पण ते म्हणाले की तिथे काही गोष्टी चांगल्याही होतात. ट्रम्प सरकार अमेरिकामध्ये होणारा वर्णद्वेष कसा थांबवणार आहेत किंवा या विरोधात कोणतं पाऊल उचलणार आहेत हे मला पहायचं आहे'.
दरम्यान, श्रीनिवास कुचीबोटला याची वर्णविद्वेषातून हत्या करण्यात आल्याचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात बोलताना निषेध केला. नवीन स्थलांतर नियम हे केवळ देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत असे ते म्हणाले. आम्ही अशा हीन स्वरूपाच्या कृत्यांचा निषेध करतो असे सांगत त्यांनी ज्यू केंद्रांना दिल्या जाणाऱ्या धमक्या व कन्सास गोळीबार घटनेचा उल्लेख केला. जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे संयुक्त अधिवेशनात हे पहिलेच भाषण होते.