"जाड आहेस, जिमला जा...", महिला कर्मचाऱ्याबद्दल कमेंट करणं बॉसला महागात, द्यावे लागले १८ लाख रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 02:39 PM2022-10-30T14:39:34+5:302022-10-30T14:41:50+5:30
महिला कर्मचाऱ्याबाबत देहयष्टीवरुन कमेंट करणं कंपनीच्या बॉसला चांगलंच महागात पडलं आहे.
नवी दिल्ली-
महिला कर्मचाऱ्याबाबत देहयष्टीवरुन कमेंट करणं कंपनीच्या बॉसला चांगलंच महागात पडलं आहे. कंपनीचा बॉस एका महिला कर्मचाऱ्याला ती 'जाड' असल्याचं संबोधत असे आणि तिला वारंवार जिम जॉइन करण्याचा सल्ला देत असे. ऑफीसमध्ये बॉसकडून केल्या दिल्या जाणाऱ्या या अपमानास्पद वागणुकीला वैतागून अखेर संबंधित महिला कर्मचारी थेट कोर्टात गेली. कोर्टात सुनावणीनंतर कंपनीच्या बॉसला न्यायाधीशांनी खडेबोल सुनावले. तसंच दंड स्वरुपात १८ लाख रुपये भरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत.
'बॉडी शेमिंग' विरोधात आवाज उठवणाऱ्या या ३५ वर्षीय महिला कर्मचारीचं नाव आयशा जमानी असं आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो येथील रहिवाशी असलेल्या जमानी यांनी त्यांच्या कंपनीचा बॉस शहजाद युनूस (४५) ऑफीसमध्ये जमानी यांना त्या जाड असल्याबाबत कमेंट करत असे आणि इतरही काही नावांनी हाक मारत असे. तसंच त्यानं जमानी यांना अनेकदा आक्षेपार्ह मेसेजेस देखील पाठवले होते.
'जाड आणि कुरुप' म्हणायचा बॉस
जमानी यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांचा बॉस शहजाद जमानी यांना त्यांच्या जाड शरीरयष्टीवरुन सारखं चिडवत असे. ऑफिसमध्ये मला स्लिम आणि सुंदर मुलींचीच गरज आहे. तू जाड आणि कुरूप आहेस, असं शहजाद म्हणायचा असा दावा जमानी यांनी केला. 'डेली रेकॉर्ड'च्या माहितीनुसार हे प्रकरण जवळपास दोन वर्ष सुरू होतं. या सगळ्याचा परिणाम जमानी यांच्या मानसिक आरोग्यावर झाला. अखेर वैतागून टेक्सटाइल कंपनीत काम करणाऱ्या जमानी यांनी आपल्याच बॉस विरोधात कोर्टात धाव घेतली. कंपनीचा बॉस कर्मचाऱ्यांना धमकी देतो आणि त्यांना गुलामासारखं वागवतो, असा आरोपही जमानी यांनी केला.
नुकतंच कोर्टानं या प्रकरणाच्या सुनावणीत बॉस शहजाद युनूस याचं वागणं अपमानकारक आणि आक्षेपार्ह असल्याचं मान्य केलं. तसंच कोर्टानं शहजाद याला १८ लाख रुपये दंड स्वरुपात जमानी यांना देण्याचेही आदेश दिले आहेत.