महिलांचे सेक्स हार्मोन्स ठरू शकतात दम्याला कारणीभूत- निरीक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 02:08 PM2018-02-18T14:08:31+5:302018-02-19T03:13:17+5:30
महिलांमध्ये असलेले सेक्स हार्मोन्स हे अलर्जी आणि दम्यासारख्या समस्यांना आमंत्रण देत असल्याचा दावा इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
लंडन- महिलांमध्ये असलेले सेक्स हार्मोन्स हे अॅलर्जी आणि दम्यासारख्या समस्यांना आमंत्रण देत असल्याचा दावा इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी केला आहे. वैज्ञानिकांनी पाच लाखांहून अधिक महिलांचं सर्वेक्षण केलं. सखोल विश्लेषण केल्यानंतर महिलांच्या जीवनात होणा-या महत्त्वपूर्ण बदलांमुळे अलर्जी आणि दम्याची लक्षणं निर्माण होतात, असं संशोधन वैज्ञानिकांनी केलं आहे. त्याप्रमाणेच किशोरवय प्राप्त होण्याबरोबरच मासिक पाळी बंद होण्यासारख्या घटना या एकमेकांशी निगडीत असतात, असंही वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे.
इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गच्या निकोला मॅकक्लियरी यांच्या मते, तारुण्य प्राप्त झाल्यानंतर मासिक पाळीच्या चक्रात व्यत्यय आल्यास दमा आणि अॅलर्जी सारख्या लक्षणांना निमंत्रण मिळतं. परंतु या मागची कारणं अद्यापही अस्पष्टच आहेत. वैज्ञानिकांनी दम्यानं पीडित असलेल्या महिलांचं तारुण्यापासून वय वर्ष 75 पर्यंतच्या पाच लाखांहून अधिक महिलांवर संशोधन केलं आहे.
जर्नल ऑफ एलर्जी अँड क्लिनिकल इम्युनॉलजी यांनी हे सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे इंग्लंडच्या वैज्ञानिकांनी हार्मोन्समधील वाढत्या बदलांमुळे अॅलर्जी आणि दम्याची लक्षणं निर्माण होत असल्याचं निष्पन्न केलं आहे.