इस्रायलने पुन्हा धुडकावले युद्धबंदी करण्याचे आवाहन; अमेरिकेच्या मतांशी विसंगत भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:54 AM2023-11-13T10:54:51+5:302023-11-13T10:55:01+5:30
ओलिसांच्या सुटकेपर्यंत माघार नाही, नेतन्याहूंचा पुनरुच्चार
खान युनिस (गाझा पट्टी) : गाझा पट्टीच्या सर्वांत मोठ्या रुग्णालयाजवळ इस्रायली सैनिक व हमासच्या दहशतवाद्यांत भीषण लढाई सुरू असून इस्रायलने शनिवारी रात्री व रविवारी सकाळी या भागात प्रचंड हवाई हल्ले केले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धबंदीचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे आवाहन पुन्हा धुडकावले असून, ओलिसांची सुटका होईपर्यंत लढाई सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे.
युद्ध सहाव्या आठवड्यात प्रवेश करत असताना, तात्पुरत्या युद्धबंदीसाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. तत्पूर्वी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी युद्धबंदीचे आंतरराष्ट्रीय आवाहन धुडकावले. गाझा पट्टीवर सत्ता गाजवणाऱ्या हमासच्या अतिरेक्यांना चिरडण्याचा इस्रायलचा लढा ‘पूर्ण ताकदीने’ सुरू राहील, असे ते म्हणाले. टीव्हीवरील एका भाषणात नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, गाझामधील अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेल्या २३९ लोकांना सोडले तरच युद्धबंदी शक्य आहे.
अमेरिकेच्या मतांशी विसंगत भूमिका
नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात भर दिला की, युद्धानंतर गाझाचे निशस्त्रीकरण केले जाईल. इस्रायल भूभागावर आपले सुरक्षा नियंत्रण राखेल. ही भूमिका इस्रायलचा मित्र अमेरिकेने युद्धोत्तर परिस्थितींबाबत व्यक्त केलेल्या मतांशी विसंगत आहे. इस्रायलने हा परिसर ताब्यात घेण्यास विरोध असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.
इस्रायली वसाहतींविराेधात ठरावास भारताचा पाठिंबा
नपॅलेस्टाईनमधील इस्रायलच्या वसाहतींचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेमसह सीरियाच्या टेकड्यांधील पॅलेस्टिनाव्याप्त प्रदेशात वसाहती निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा निषेध करणारा ठराव गुरुवारी मंजूर करण्यात आला. याला विरोध करणाऱ्या सात देशांमध्ये अमेरिका आणि कॅनडा यांचा समावेश आहे. अठरा देश मतदानापासून दूर राहिले.