जगातील पाचवा सर्वात मोठा हिरा सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 11:08 PM2018-01-16T23:08:12+5:302018-01-16T23:09:13+5:30
सर्वसामान्यपणे मनुष्याला सोने, हिरे, रत्नांचे मोठय़ा प्रमाणात आकर्षण असते. राजा-महाराजांच्या काळात तर युद्धाच्या तहाच्या वेळी सोने, हिरे, मोती आदींची मागणी केली जात होती.
लिसोथो : सर्वसामान्यपणे मनुष्याला सोने, हिरे, रत्नांचे मोठय़ा प्रमाणात आकर्षण असते. राजा-महाराजांच्या काळात तर युद्धाच्या तहाच्या वेळी सोने, हिरे, मोती आदींची मागणी केली जात होती. आपल्या खजिन्यात वेगवेगळ्या प्रकारचे हिरे, रत्न असावे, त्याचा भारदस्त टोप आपल्या शिरावर असावा, असाच प्रयत्न त्याकाळी राजेशाहीचा होता. हेच आकर्षण आजही कायम आहे. वेगवेगळे हिरे, रत्नांचा खजाना साठविणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असले, तरीही वेगवेगळी माहिती मात्र सामान्य माणूस ठेवत असतो. जगातील आगळे-वेगळे वैशिष्ट्य असणार्या चार हिर्यांच्या यादीत आता आणखी एका हिर्याची भर पडली आहे. हा हिरा आता सर्वांसाठी औत्सुक्याचा ठरणार आहे.
लिसोथो येथील एका हिरे व रत्न कंपनीने जगातील सर्वात मोठा पाचव्या क्रमांकाचा हिरा शोधल्याचा दावा सोमवारी केला. या हिर्याची किंमत ४0 मिलिअन डॉलर एवढी असून, दक्षिण आफ्रिकन देशात तो शोधण्यात आला. ९१0 कॅरेटचा हा हिरा अतिशय दुर्मीळ असल्याचे सांगण्यात आले. २00६ नंतर अनेक मौल्यवान हिर्यांचा शोध घेतल्याचे जेम डायमंडचे चीफ एक्झिकेटिव्ह क्लिफोर्ड एल्फीक यांनी सांगितले. हिरे आणि रत्नांच्या जाणकार असलेले बेन डेव्हिस यांनी या हिर्याचा शोध अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.