अविश्वास प्रस्तावापूर्वी इम्रान खान यांना मोठा झटका, 50 मंत्री बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 05:05 PM2022-03-26T17:05:40+5:302022-03-26T17:07:15+5:30
Imran Khan : पाकिस्तानी संसदेत शुक्रवारी इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव विरोधकांना मांडता आला नाही. आता सोमवारी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणातील मोठी बातमी म्हणजे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे 50 मंत्री अविश्वास प्रस्तावापूर्वीच (No Confidence Motion) बेपत्ता झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफला (PTI) मोठा झटका बसला आहे. इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात आली आहे.
इम्रान खान यांचा राजीनामा देण्याचा निर्णय निश्चित
इम्रान खान यांच्या सरकारमधील 25 संघीय, 19 सहाय्यक आणि 4 राज्यमंत्री बेपत्ता आहेत. संकटाच्या काळात इम्रान खान यांच्या मंत्र्यांनी मैदानातून पळ काढला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि याबाबत आता निर्णय जवळपास निश्चित झाला आहे.
पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव कधी मांडला जाणार?
विशेष म्हणजे, या संकटात अनेक समर्थकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पाठिंबा काढला आहे. 28 मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. अविश्वास प्रस्तावावर 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत मतदान होणार आहे.
वेळेआधी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे संकेत
पाकिस्तानी संसदेत शुक्रवारी इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव विरोधकांना मांडता आला नाही. आता सोमवारी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. दरम्यान, इम्रान सरकारने सत्तेतून बाहेर पडल्यास वेळेआधी सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. म्हणजेच विरोधकांना मात देण्यासाठी इम्रान खान निवडणुकीची खेळी खेळू शकतात.