फिजी-पलाऊचा मोदींना सर्वोच्च पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 05:54 AM2023-05-23T05:54:19+5:302023-05-23T05:54:27+5:30
जेम्स मारेप म्हणाले, भारत आमचा नेता...
पोर्ट मोरेस्बी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पापुआ न्यू गिनी येथे आयोजित हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र सहकार्य मंचच्या (एफआयपीआयसी) बैठकीत सहभागी झाले. यादरम्यान पलाऊ प्रजासत्ताक आणि फिजीने त्यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला. या दोन प्रशांत महासागरातील बेट राष्ट्रांचा सर्वोच्च सन्मान दुसऱ्या देशातील व्यक्तीला मिळणे दुर्मीळ आहे.
द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या उद्देशाने भारत आणि १४ प्रशांत महासागरातील बेट राष्ट्रांच्या प्रमुख शिखर परिषदेसाठी मोदी रविवारी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. सोमवारी एका विशेष समारंभात पापुआ न्यू गिनीचे राज्यपाल सर बॉब डेडे यांनी पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ हा पुरस्कार प्रदान केला. त्यापूर्वी फिजीचे पंतप्रधान सितविनी राबुका यांनी मोदींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च सन्मान ‘कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ देऊन सन्मानित केले.
विकसित देशांच्या शक्तिप्रदर्शनाचे आपण बळी : मारेप
एफआयपीआयसीच्या बैठकीत पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप म्हणाले, ‘भारत हा विकसनशील आणि गरीब देशांचा नेता आहे. रविवारी मारेप यांनी पंतप्रधान मोदींच्या पायांना स्पर्श करून त्यांचे स्वागत केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी न्यूझीलंडचे त्यांचे समकक्ष ख्रिस हिपकिन्स यांची प्रथमच भेट घेतली.
अनेक विकास उपक्रमांची घोषणा
फिजीमध्ये एक सुपर स्पेशालिटी काॅर्डिओलॉजी रुग्णालय तयार करणार. या मेगा ग्रीन प्रकल्पाचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व १४ देशांमध्ये डायलिसिस युनिट्स उभारण्यासाठी भारत मदत करणार, या देशांना ‘सी-ॲम्ब्युलन्स’ सेवा पुरवणार.
या देशांमध्ये योग केंद्रे सुरू करण्याचा भारताचा प्रस्ताव.
फिजीच्या नागरिकांसाठी चोवीस तास आपत्कालीन हेल्पलाइन सुरू करणार.
मोदी ऑस्ट्रेलियात दाखल
पंतप्रधान मोदी तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सिडनी येथे दाखल झाले. येथे ऑस्ट्रेलियन भारतीय समुदायाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.