डोनल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केल्या केनेडी हत्याप्रकरणातील फाईल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 12:03 PM2017-10-27T12:03:46+5:302017-10-27T12:22:19+5:30
अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन.एफ. केनेडी यांच्या हत्या प्रकरणातील सुमारे 2800 फाईल्स अमेरिकन सरकारने आज प्रसिद्ध केल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ही अंमलबजावणी करण्यात आली आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन.एफ. केनेडी यांच्या हत्या प्रकरणातील सुमारे 2800 फाईल्स अमेरिकन सरकारने आज प्रसिद्ध केल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ही अंमलबजावणी करण्यात आली आहे. अर्थात एफबीआय आणि सीआयएने सुरक्षेच्या कारणास्तव आक्षेप घेतल्यानंतर इतर फाईल्स जाहीर करणे थांबवण्यात आले.
22 नोव्हेंबर 1963 रोजी टेक्सस राज्यातील डल्लास येथे केनेडी यांची हत्या करण्यात आली होती. गेल्या सहा दशकांमध्ये केनेडी यांच्या हत्येमध्ये नेमका कोणाचा सहभाग असेल याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे अमेरिकन जनमानसात याबाबत नेहमीच तर्कवितर्क उपस्थित केले जात होते. मात्र या फाईल्स उघड केल्यानंतरही फारसे काही मिळण्याची शक्यता नाही असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.
The long anticipated release of the #JFKFiles will take place tomorrow. So interesting!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 25, 2017
जेएफके फाईल्स उद्या प्रसिद्ध करणार आहोत अशी माहिती ट्रम्प यांनी आदल्यादिवशीच दिली होती.
केनेडी यांचे पूर्ण नाव जॉन फिटझगेराल्ड केनेडी असे होते. त्यांचा जन्म 29 मे 1917 रोजी मॅसॅच्युसेटसमधील ब्रुकलिन येथे झाला. अमेरिकन नौदलात लेफ्टनंट पदावरती असणाऱ्या केनेडी यांनी दुसऱ्या महायुद्धासह अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. केनेडी हे 1947 ते 1953 याकाळात मॅसॅच्युसेटसमधून संसदेच्या कनिष्ठ सभागृहात तर 1953 ते 1960 या काळात वरिष्ठ सभागृहात सदस्य म्हणून कार्यरत होते. 1961 साली ड्वाईट आयसेनहॉवर यांच्यानंतर ते अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्या हत्येनंतर उपराष्ट्राध्यक्ष असणारे लिंडन जॉन्सन राष्ट्राध्यक्ष झाले.
U.S. releases partial records of Kennedy's assassination after a delay
— ANI Digital (@ani_digital) October 27, 2017
Read @ANI story | https://t.co/qVyZtJ84zUpic.twitter.com/NNsWiTHRoy
केनेडी यांच्या हत्येनंतर अनेक सरकारांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले. पण सर्व चौकशी तपास आयोगांनी केनेडी यांची हत्या ली हार्वे ऑस्वल्डने टेक्सस स्कूल बुक डिपॉझिटरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन तीन गोळ्या झाडून केली असा निष्कर्ष मांडला होता. मात्र याशिवाय या हत्येमध्ये आणखी कोणत्यातरी व्यक्तीचा किंवा यंत्रणेचा, कटाचा सहभाग असावा असे अमेरिकन लोकांना वाटते. ऑस्वल्ड हा स्वयंघोषित मार्क्सवादी होता. त्याने रशियामध्ये 1959 ते 1962 या कालावधीत मुक्काम केला होता. तसेच तेथे त्याने रेडिओ आणि टिव्ही कंपनीमध्ये काम केले होते. केनेडी हत्येचा तपास करणाऱ्या वॉरन कमिशनने ऑस्वल्ड केनेडी हत्येआधी काहीदिवस मेक्सिकोसिटी मधील क्युबन व रशियन दुतावासाच्या संपर्कात होता असे निरीक्षण मांडले आहे. काही लोकांच्या मते केनेडी यांची हत्या करताना तेथे दुसरी व्यक्तीही उपस्थित असावी. तसेच त्यांचा वेध घेणारी गोळी त्यांच्या पाठीमागून नव्हे तर समोरुन आली असावी असेही अनेकांचे मत आहे. या हत्येसंदर्भात 1979 साली नेमलेल्या हाऊस सिलेक्ट कमिटीने या हत्येत दोन शूटर्सचा समावेश असावा अशी शक्यता असल्याचे निरीक्षण मांडले होते.
TWO SHOOTERS? #JFKFilespic.twitter.com/szt8IWaBZD
— JFK Files (@JFKFiles) October 27, 2017