अमेरिकेला हाकलणे हेच असेल अंतिम उत्तर, इराणची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:19 AM2020-01-09T06:19:56+5:302020-01-09T06:20:11+5:30

आम्ही काल रात्री अमेरिकेच्या मुस्कटात लगावली; पण जी घटना घडली आहे, त्याला उत्तर देण्यास तेवढे पुरसे नाही.

The final answer - the announcement of Iran - will be to oust the United States | अमेरिकेला हाकलणे हेच असेल अंतिम उत्तर, इराणची घोषणा

अमेरिकेला हाकलणे हेच असेल अंतिम उत्तर, इराणची घोषणा

googlenewsNext

तेहरान : आम्ही काल रात्री अमेरिकेच्या मुस्कटात लगावली; पण जी घटना घडली आहे, त्याला उत्तर देण्यास तेवढे पुरसे नाही. अमेरिकेला मध्य-पूर्व आशियातून हाकलून देणे, हेच अंतिम उत्तर असेल, असा निर्धार इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनाई यांनी बुधवारी व्यक्त केला.
इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्यानंतर सरकारी टीव्हीवरून केलेल्या भाषणात खमेनाई बोलत होते. अमेरिकेने ड्रोन हल्ला करून इराणच्या ‘रेव्होल्युशनरी गार्डस्’ सैन्यदलाच्या ‘कुद््स फोर्स’चे कमांडर मेजर जनरल कासीम सुलेमानी यांची हत्या केल्यानंतर खमेनाईच नव्हे, तर संपूर्ण इराणने अमेरिकेचा सूड उगविण्याची धमकी दिली होती. मंगळवारी रात्रीचा हल्ला ही इराणने त्याच सूडभावनेने केलेली कारवाई होती. सुलेमानी यांच्या हत्येचा थेट उल्लेख न करता अयातुल्ला खमेनाई म्हणाले, एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली आहे. त्या अनुषंगाने आता आपले काय कर्तव्य ठरते, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जे घडले त्याला उत्तर देण्यासाठी आता केलेली लष्करी कारवाई पुरेशी नाही. या भागातून अमेरिकेला हाकलून देणे हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे.
या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना इराणचे संरक्षणमंत्री आमिर हातामी म्हणाले की, आम्ही आखूड पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला... यावरून अमेरिका योग्य तो धडा घेईल, अशी आशा आहे. अमेरिकेने काही जबाबी कारवाई केली, तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे प्रशासन हे एक दहशतवादी सरकार बनवून टाकले आहे. सौदी अरेबिया व इस्रायल या अमेरिकेच्या मित्रांनी कागाळी केल्यास त्यांच्यावरही हल्ला होऊ शकेल.
अमेरिकेला धडा शिकवण्याचे इराणने सुलेमानी यांच्या हत्येनंतर लगेचच जाहीर केले होते. सुलेमानी यांचा दफनविधी पार पडल्यानंतर लगेचच हल्ल्याला सुरुवात झाली. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डस् सैन्यदलाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे ज्यावेळी सुलेमानी ‘शहीद’ झाले नेमकी तीच बुधवार पहाटेची वेळ हल्ल्यासाठी निवडली गेली.
>इराणला भूकंपाचा धक्का
इराणच्या भूशेर अणु वीज प्रकल्पापासून ५० किलोमीटरवर बुधवारी ४.५ तीव्रेतच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू दहा किलोमीटरवर होता व बोराझजान शहराच्या दक्षिण-आग्नेय दिशेला १७ किलोमीटरवर तो धक्का बसला, असे अमेरिकेच्या भूगर्भ सर्व्हेने संकेतस्थळावर म्हटले. अणु वीज प्रकल्पाची या भूकंपामुळे काहीही हानी झाल्याचे वृत्त नाही. परंतु, सात जण जखमी झाले, असे इराणची अधिकृत वृत्तसंस्था ‘इर्ना’ने म्हटले.
>ट्रम्प म्हणतात, सर्व काही आलबेल!
इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर इराणकडून क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याची अधिकृत कबुली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. मात्र, ‘सर्व काही आलबेल आहे,’ असे म्हणण्याखेरीज त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही. इराणने स्थानिक वेळेनुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा हल्ला केल्यानंतर ट्रम्प जाहीर कार्यक्रमात कुठे दिसले नाहीत.
>अमेरिकेचे अभिनंदन : इस्रायल
इस्रायल पूर्णपणे अमेरिकेच्या पाठीशी आहे. दहशतवाद्यांचे शिरोमणी असलेल्या सुलेमानींच्या विरोधात तत्परतेने, धाडसाने आणि निर्धाराने कारवाई केल्याबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन. इस्रायलवर हल्ल्याचा जो कोणी प्रयत्न करील त्याला जबर उत्तर दिले जाईल.
-बेन्जामिन नेत्यानाहू, पंतप्रधान, इस्रायल

Web Title: The final answer - the announcement of Iran - will be to oust the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.