Eric Garcetti: अखेर नेमणूक झाली! एरिक गार्सेटी अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत, बायडेन यांचे खास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 07:54 AM2023-03-16T07:54:02+5:302023-03-16T07:54:39+5:30
अमेरिकेतील सरकार बदलल्यानंतर राजदूत केनेथ जस्टर यांनी जानेवारी २०२१ मध्ये राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.
लॉस अँजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी यांना अमेरिकेने भारतातील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. अमेरिकेच्या संसदेने गार्सेटी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यांचे नामांकन सिनेटमध्ये 52-42 ने मंजूर झाले. भारतातील अमेरिकेचे राजदूत हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त होते.
गेल्या काही काळापासून रिक्त असलेली महत्त्वाची जागा भरण्यासाठी आवश्यक असलेल्या आजच्या निकालामुळे आपण खूप खूश असल्याचे गार्सेटी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 'मी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि व्हाईट हाऊसचा आभारी आहे. भारतातील अमेरिकेची सेवा सुरु करण्यास उत्सुक आहे.', असे ते म्हणाले.
अमेरिकेतील सरकार बदलल्यानंतर राजदूत केनेथ जस्टर यांनी जानेवारी २०२१ मध्ये राजीनामा दिला होता. जुलै 2021 मध्ये बायडेन यांनी एरिक गार्सेट्टी यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्तीची घोषणा केली. परंतू, सिनेटमध्ये पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांचे नामांकन संसदेत मतदानासाठी आणले गेले नव्हते. गेल्या आठवड्यातच समितीने मंजुरी देत यावर मतदान घेण्यासाठी सिनेटमध्ये पाठविले होते. समितीने 13-8 अशा मतांनी मंजुरी दिली होती.
एरिक गार्सेटी यांच्या निकटवर्तीय रिक जेकब्सवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले होते. महापौर असताना त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असतो. या आरोपांमुळेच एरिक गार्सेट्टी यांची नियुक्ती होत नव्हती. रिपब्लिकन पक्षासोबतच काही डेमोक्रॅट खासदारही गार्सेटींनी भारतात नियुक्त करण्याच्या विरोधात होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या ते अत्यंत जवळचे आहेत. गार्सेटी यांना बायडेन सरकारमध्ये मंत्री पद मिळणार होते. परंतू, या आरोपांमुळे त्यांना बाजुला ठेवण्यात आले होते.