अखेर अमेरिकेकडून भारतासह आठ देशांना इराणचे तेल घेण्याची सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 05:24 AM2018-11-03T05:24:31+5:302018-11-03T06:59:52+5:30
किमती भडकू न देण्यासाठी केली तडजोड
नवी दिल्ली : इराणविरोधात ५ नोव्हेंबरपासून नव्याने लागू होत असलेल्या निर्बंधांतही भारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. अमेरिकेेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संपूर्ण कोंडी करण्यासाठी हे निर्बंध लावले आहेत. इराणकडून तेल खरेदी पूर्णत: थांबविण्याचे निर्देश प्रशासनाने जगभरातील देशांना दिले होते. परंतु इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या काही देशांनी याला आक्षेप घेतला होता.
इराणकडील तेलखरेदी बंद केल्यास जगभरात कच्च्या तेलाच्या किमती भडकतील. त्यामुळे तडजोडीचा मार्ग म्हणून ट्रम्प प्रशासनाने आठ देशांना इराणकडून तेल खरेदीची सवलत दिली आहे. भारतासह जपान व दक्षिण कोरिया यांचा या देशांत समावेश आहे. चीन हा इराणी तेलाचा सर्वांत मोठा आयातदार आहे. चीनला तेल आयातीची सवलत मिळाली असली तरी अटींच्या मुद्यावर दोन्ही देशांत अजून चर्चा सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले. इतर चार देश कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ही सवलत तात्पुरती असणार आहे.
भारताकडून इराणी तेल आयातीत ३0% कपात
दरम्यान, भारताने इराणच्या तेलाची आयात तब्बल ३0 टक्क्यांनी कमी केली आहे. इराणचे तेल आयात करण्यात अमेरिकेकडून सवलत मिळावी, यासाठी ही कपात करण्यात आली. त्याच आधारावर अमेरिकेने भारताला निर्बंधांतून सवलत दिली आहे. रिलायन्ससारख्या काही कंपन्यांनी इराणचे तेल खरेदी करणे आधीच थांबविले आहे. एस्सार-नायरा ही खाजगी कंपनी मात्र स्पॉट मार्केटमधून अजून इराणी तेल उचलत आहे.