अखेर पंतप्रधान मोदी अन् इम्रान खान यांची भेट झालीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 08:50 PM2019-06-14T20:50:58+5:302019-06-14T20:52:11+5:30
परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी इम्रान खानला भेटणार नसल्याचे भारताच्या प्रतिनिधींनी सांगितले होते.
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बिश्केकमधील एससीओच्या परिषदेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेण्याचे किंवा नजरानजर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळले होते. मात्र, शुक्रवारी रात्री मोदींनी इम्रान खान यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकलेला नसला तरीही खान यांनी शुभेच्छा दिल्याचे समजते.
या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी इम्रान खानला भेटणार नसल्याचे भारताच्या प्रतिनिधींनी सांगितले होते. परिषदेमध्ये मोदी आणि इम्रान खान एकाच डिनर टेबलवर होते. मात्र मोदींनी खान यांच्याशी संवाद साधला नाही. मोदींनी त्यांच्याकडे पाहणंदेखील टाळले होते. तसेच पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने हवाई हद्द बंद केली होती. ती नुकतीच खुली करण्यात आली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्यास पाकिस्तानने परवानगी दिली होती. परंतू मोदींच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर न करता वळसा घालून परिषदेचे स्थळ गाठले होते.
Sources: Prime Minister Narendra Modi exchanged usual pleasantries with the Prime Minister of Pakistan Imran Khan in the Leaders' Lounge at the SCO Summit in Bishkek #Kyrgyzstanpic.twitter.com/5mzBatH7fr
— ANI (@ANI) June 14, 2019
आठ देशांचा समावेश असलेल्या एससीओ परिषदेला गुरुवारपासून किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये सुरुवात झाली. या परिषदेदरम्यान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा केली.
पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला असून, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत दहशतवादाचा क्रूर चेहरा समोर आला. सर्वच मानवतावादी शक्तींनी या दहशतवादाशी निपटण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. दहशतवाद्यांना निधी पुरवणाऱ्या देशांचं फंडिंग बंद केलं पाहिजे, असंही मोदी म्हणाले आहेत.