सीरियात शांततेसाठी काढा तोडगा; भारताचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 07:43 AM2024-12-10T07:43:07+5:302024-12-10T07:43:23+5:30
भारतीयांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र खाते तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात, सीरियातील बंडखोरांनी रविवारी त्या देशाची राजधानी दमास्कसवर कब्जा मिळविला व राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे सरकार उलथून टाकले.
जेरुसलेम/नवी दिल्ली : सीरियामध्ये स्थैर्य निर्माण होण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने राजकीय प्रश्नावर तोडगा काढावा असे आवाहन भारताने केले आहे. बंडखोरांनी सीरियामध्ये सत्ता काबीज केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे. सीरियातील बंडखोरांनी रविवारी त्या देशाची राजधानी दमास्कसवर कब्जा मिळविला व राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे सरकार उलथून टाकले. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात सोमवारी म्हटले आहे की, सीरियातील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्या देशाची एकता, सार्वभौमत्व, अखंडता जपण्यासाठी तेथील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. दमास्कसमधील भारतीय दूतावास तसेच सीरियामध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्या देशाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
सीरियातील जनतेसाठी एक ऐतिहासिक संधी
गेल्या पन्नास वर्षांत अनेक निरपराध लोकांना ठार करणाऱ्या असद राजवटीचे झालेले पतन ही सीरियातील जनतेसाठी एक ऐतिहासिक संधी आहे, असे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी सांगितले.
गेली अनेक वर्षे या देशात यादवी सुरू होती. बंडखोरांनी असद यांचे सरकार उलथवून लावले. आता देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याची महत्त्वाची संधी सीरियातील लोकांना मिळाली आहे. त्यांनी त्याचा योग्य उपयोग करायला हवा, असेही बायडेन यांनी सांगितले.
इस्रायलचा रासायनिक शस्त्रे, रॉकेटच्या साठ्यावर हल्ला
सीरियामधील बंडखोरांच्या हाती रासायनिक शस्त्रे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे लागू नयेत यासाठी इस्रायलने सोमवारी त्या शस्त्रसाठ्यावर हल्ला करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी गटाचा प्रमुख सहकारी असलेला बशर असद याच्या पतनाचे इस्रायलने स्वागत केले आहे. आमच्यासाठी इस्रायलच्या नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, सीरियात हे हल्ले कोणत्या ठिकाणी करण्यात आले हे इस्रायलने स्पष्ट केलेले नाही.
रशियाचा नेत्यांशी संपर्क
सीरियामध्ये असलेल्या आपल्या लष्करी तळांवर हल्ले होऊ नये, यासाठी आता रशियाने सीरियातील नव्या नेतृत्वाशी संपर्क करण्यास सुरूवात केली आहे.