‘कोरोना’वर लस शोधणे हाच आता प्रभावी उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 03:05 AM2020-04-17T03:05:29+5:302020-04-17T03:05:39+5:30
संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख : वर्षाच्या अखेरपर्यंत शोध लागण्याची आशा
न्यूयॉर्क : कोरोना व्हायरसमुळे पसरलेल्या ‘कोविड-१९’ आजाराच्या साथीने जगाचे विस्कळीत झालेले व्यवहार पूर्ववत होण्यासाठी या आजारावर प्रतिबंधक लस शोधणे हाच प्रभावी उपाय दिसतो, असे मत संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अॅन्तोनिओ ग्युटेर्स यांनी व्यक्त केले. अशी लस कदाचित या वर्षाच्या अखेरपर्यंत शोधली जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रसंघाचे सदस्य असलेल्या ५० हून अधिक आफ्रिकी देशांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ बैठकीत बोलताना ग्युटेर्स म्हणाले की, या साथीवर सुरक्षित व परिणामकारक लस शोधली गेली, तरच लाखो प्राण आणि अब्जावधी डॉलरचे नुकसान वाचवून जगाचा गाडा पूर्वपदावर येऊ शकेल असे दिसते.
अशी लस शोधली गेली आणि ती जगातील सर्व देशांना लवकरात लवकर उपलब्ध झाली, तरच या साथीचा पूर्ण प्रतिबंध होऊ शकेल. यासाठी सर्व देशांनी पूर्ण सहकार्य व समन्वयाने वागायला हवे, असेही ग्युटेर्स यांनी नमूद केले.
या साथीचा मुकाबला करण्यासाठी सदस्य देशांनी दोन अब्ज डॉलरचा निधी देणग्या देऊन उभारावा, असे आवाहन ग्युटेर्स यांनी २५ मार्च रोजी केले होते. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत त्यापैकी २० टक्के रक्कम जमा झाली आहे. ’’ (वृत्तसंस्था)
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने नायजेरियातील लागोस राज्यात आयोजित आरोग्य शिबिरामध्ये तेथील नागरिकांना शिकताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघ अनेक देशांना विविध प्रकारची मदत पुरवित आहे. या अंतर्गत आफ्रिकेतील ४७ देशांना कोरोना चाचणीचे साहित्य पुरविले आहे.
-अॅन्तोनिओ ग्युटेर्स
सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रसंघ